यवतमाळ - शेतकऱ्यांसाठी सोयाबीनचे हे पीक नगदी पीक समजले जाते. यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनच्या काढणीला आता वेग पकडू लागला आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन कापणी लांबली. यावर्षी मजुरांची टंचाई व वाढते दर यामुळे शेतकऱ्यांनी यांत्रिकी कापणीवर भर दिला आहे.
अनेक मोठे शेतकरी सोयाबीन काढणी ही हार्वेस्टर माध्यमातून करीत आहेत. मजुरांकडून सोयाबीन पीक काढणीचा खर्च हा एकरी चार हजार रुपये येतो. शिवाय ही वेळखाऊ पद्धत आहे. तर हार्वेस्टरच्या माध्यमातून सोयाबीन काढणीचा खर्च हा केवळ १६०० रुपये एकरी येत आहे. यामुळे शेतकर्यांचा वेळ, श्रम व पैसा वाचण्याबरोबरच शेतातील लक्ष्मी काही क्षणातच शेतकर्याच्या घरात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हार्वेस्टरने सोयाबीन काढणीला पसंती दिल्याचे दिसून येत आहे.