वाशिम- उत्पादन खर्च वाढून उत्पन्नात होणाऱ्या घटीने शेतकरी मोडकळीस आला आहे. त्यामुळे शेतकरी हळदीच्या नगदी पिकाकडे वळला आहे. सध्या वाशिम जिल्ह्यात हळदीचा हंगास जोरात सुरू असून शेतकरी भर उन्हात हळकुंडाला कढईतून काढत आहेत.
हळद कढईतून काढताना शेतकरी हळद काढताना हळदीची मोड आणि बीज वेगळे काढतात. त्यानंतर ती शिजवण्याकरता खळ्यावर नेली जाते. यासाठी गावाबाहेर एका शेतात उकाडा लावण्यात येतो. उकाड्यावर मोठी चूल असून त्यावर एक लोखंडी कढई असते. यामध्ये १/३ पाणी टाकून हळदीची मोड टाकली जाते. एकावेळी ८ क्विंटल हळद शिजविण्याची क्षमता या कढईची आहे.
कढईमध्ये टाकलेल्या हळदीच्या मोडीवर पाणी टाकले जाते. हळदीवर गोणपाट किंवा तरट झाकून हळदीचा पालापाचोळा टाकतात. १५ ते २० मिनीट हळद उकळण्याचा कार्यक्रम होऊन वाफ बाहेर येताच तो उकाडा बंद करुन हळद खळ्यावर टाकली जाते. शिजविलेली हळद १५ ते २० दिवस वाळू घातली जाते व ती बाजारात विकल्या जाते.
जिल्ह्यातील ८९५ हेक्टरवर यावर्षी हळद लागवड झाली आहे. सध्या हळदीचा हंगाम जोरात सुरू आहे. मात्र काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने कढईत उकळून प्रक्रिया करीत आहेत. त्यामुळे मजूर जास्त लागतात. वाशिम येथील शेतकरी सागर रावले यांनी भाड्याने बॉयलर आणून हळदीची प्रक्रिया सुरू केली आहे. बॉयलरमधून चांगल्या प्रतीची हळद मिळत असून खर्च कमी येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बॉयलरचा वापर केल्यास याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती रावले यांनी दिली. दरम्यान शेतकऱ्यांना हळदीचे पीक तारणार असल्याची आशा लागून आहे.