वर्धा - राज्यात सध्या कोरोना विषाणूने आपले पाय पसरायला सुरुवात केली आहे. मात्र, वर्धा जिल्हा अद्यापही ग्रीनझोन मध्ये आहे. त्यामुळे जिल्ह्यात काही उद्योगांना शिथिलता देण्यात आली आहे. पण शहरात कुठल्याही प्रकारची ही शिथिलता देण्यात आली नसल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, अत्यावश्यक वस्तू खरेदीला दिलेल्या सवलतीचा फायदा घेत कारण नसताना काही नागरिक बाहेर फिरत आहेत, अशा नागरिकांवर प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
राज्यातील काही ठिकाणी लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. मात्र वर्धा शहरात सध्या शेती संबंधीचे कामे, कृषी उत्पादन संबंधित दुकाने आणि काही उद्योगांनाच शिथिलता देण्यात आली आहे. इतर गोष्टींसाठी लॉकडाऊनच्या नियम अटीनुसारच कामकाज सुरू आहे. तसेच यापुढेही त्याच पद्धतीने कामकाज चालणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी दिली जाणारी सवलत पाहता मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडले आहेत. यासाठी उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, पोलीस उपविभागीय अधिकारी पियुष जगताप, तहसीलदार प्रीती डुडुलकर यासह महसूल पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अनेक जण हे विनाकारण फिरत असल्याचे खासकरुन दुचाकी धारक, दुकाने बंद असलेले कारण सांगत फिरणाऱ्यावर दुचाकी थांबत दंड देण्यात आले. यामध्ये विनाकारण दुचाकीवर प्रवास आणि मास्क न घालणाऱ्यांवर २०० रुपये अशी दंडात्क कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस, महसूलची कारवाई, नागरिकांना दिला घरात राहण्याचा सल्ला