वर्धा - सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाच्या तिकीटघरावर असलेल्या कर्मचाऱ्याशी वाद घालत एका गटाने शासकीय कामात व्यत्यय आणला. बुधवारी दुपारी सफारीसाठी आलेल्या या पर्यटकांनी खासगी वाहनाने आत जाण्याचा आग्रह धरला. यामुळे कर्मचारी आणि पर्यटक यांच्यात वाद झाला. या वादात वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनाही या पर्यटकांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश ठाकूर, स्वप्नील तळवेकर, मंगेश रामटेके यांच्यासह अन्य सात लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
बोर व्याघ्र प्रकल्पातील कर्मचारी-अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली सरकारी कामात अडथळा -
बोर व्याघ्र प्रकल्पात अनेक पर्यटक जंगल सफारीसाठी येतात. यावेळी त्यांना उपलब्ध शासकीय वाहनाने जावे लागते. प्रकल्पात स्वतःचे वाहन नेण्यास प्रतिबंध आहे. बुधवारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी वनरक्षक प्रेमदास भाकरे यांच्याकडे स्वत:चे वाहन नेण्याचा आग्रह धरला. या वादाचे रुपांतर धक्काबुक्की आणि शिवीगाळामध्ये झाले. घाबरलेल्या वनरक्षकांनी वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश गावंडे यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. गावंडे यांनी पर्यटकांना समजावण्याच्या प्रयत्न केला असता. त्यांनाही शिवीगाळ करण्यात आली.
घटनेचा निषेध नोंदवत काम बंदचा इशारा -
वन विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संघटनांनी या घटनेचा निषेध नोंदवला. येत्या 24 तासात हे कृत्य करणाऱ्यांना अटक केली नाही तर काम बंद आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्ह्याची नोंद केली आहे.