वर्धा - हिंगणघाट जळीतकांडाला आता ४८ तास पूर्ण झाले आहेत. पीडितेची प्रकृती गंभीर आहे. त्यात दुसरीकडे पोलीस तापसामध्ये महत्त्वाचे पुरावे समोर येत आहे. ही सर्व घटना अचानक घडली नसून त्याने आधीच थंड डोक्याने सर्व तयारी केली असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
'त्याने' तिला जाळण्याची आधीच केली होती तयारी; सोबत बॉटल, टेंभा, कपडे अन् बरंच काही... तिला जाळण्यासाठी त्याने आधीच एक बॉटल कापून ठेवली होती. जेणेकरून ते पेट्रोल तिच्या अंगावर पडावे. त्यानंतर त्याने तिला दुरूनच पेटवता येईल या हेतूने टेंभा देखील तयार केला. सोबत लाईटर, बॅग, त्यामध्ये कपडे हे सर्व साहित्य असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. पोलीस तपासामध्ये हे सर्व साहित्य जप्त करण्याची शक्यता आहे.
त्याने घटना घडल्यानंतर रिमडोह राधानगरी परिसरात जाऊन कपडे बदलले. तसेच हे कपडे जाळण्यासाठी दुसऱ्या लहान बाटलीमध्ये पेट्रोल होते, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यानंतर तो एका नातेवाईकाकडे गेला आणि त्याठिकाणी नाश्ता केला. यावेळी त्याला एक फोन आला आणि त्याने ठिकाण सोडण्याचे ठरवले. त्यानंतर तो नागपूरच्या दिशेने रवाना झाला, असेही सूत्रांनी सांगितले.
घटना घडल्यानंतर तो नागपूरच्या दिशेने गेला असेल, अशी शंका पोलिसांना होती. तशी माहिती हिंगणघाट उपविभागीय अधिकारी भीमराव टेळे यांनी दिली होती. त्यामुळे नागपूर ग्रामीण पोलीस देखील अगोदरच तयारीत होते. त्यानुसार त्याला बुट्टीबोरी परिसरातील एका मंदिरातून अटक करण्यात आल्याचे वर्धा पोलिसांनी सांगितले. साधारण ७.२० वाजता सुरू झालेला हा घटनाक्रम ११.३० वाजेपर्यंत चालला.