वर्धा- जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील सावळापूर येथे पतीवरील संशयामुळे पत्नीने 16 महिन्याच्या चिमुकल्याला घेऊन विहिरीत उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये आईला वाचविण्यात यश आले. मात्र, १६ महिन्याच्या चिमुकल्याचा जीव गेला. याप्रकरणी आईवरच हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संघर्ष निंबाळकर, असे मृत बालकाचे नाव असून प्रिया असे आईचे नाव आहे.
हे वाचलं का? - मुलीची छेड काढल्याची पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून जळगावात तरुणाचा खून
आर्वीपासून 4 किमी अंतरावर वर्धा मार्गावर सावळापूर गाव आहे. येथील योगेश निंबाळकर यांचा सुकळी भादोड येथील प्रियाशी 2016 मध्ये विवाह पार पडला. दोघांचा सुखी संसार सुरू होता. काही दिवसांपूर्वी त्यांना मुलगाही झाला. मात्र, प्रियाच्या मनात योगेशच्या नात्यातील महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयाने घर केले. याच संशयाने सुखी संसाराला आग लागली. त्यामुळे त्यांच्यामध्ये वारंवार खटके उडत होते.
योगेशने गेल्या २ महिन्यांपूर्वी तिला माहेरी सुद्धा सोडले होते. मात्र, तिची समजूत काढून १ महिन्यांपूर्वी सावळापूरला आणले. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास मुलगा रडत होता. त्यामुळे ती घराबाहेर पडली. यावेळी तिने घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विहिरीत उडी घेतली. यावेळी शेजाऱ्याच्या लक्षात आल्याने त्यांनी योगेशच्या आई-वडिलांना सांगितले. कुटुंबीयांनी तत्काळ विहिरीकडे धाव घेतली. त्यावेळी मुलगा पाण्यात होता आणि ती पाण्यात हात-पाय मारत होती. त्यामुळे स्थानिकांनी लगेच दोघांनाही बाहेर काढले. मुलगा हालचाल करत नसल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.