वर्धा-हिंगणघाट जळीतकांड घटनेनंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. खासदार नवनीत राणा, वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी हा मुद्दा लोकसभेत मांडला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गाखरे यांनीही डोक्याला काळी फित बांधून निषेध व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा द्या, अशी मागणी केली. तर सिंदी रेल्वे, वायगाव, जाम येथे कडकडीत बंद पुकारण्यात आला होता.
हिंगणघाट जळीतकांड : 'आरोपीलाही तशाच प्रकारच्या यातना देऊन फाशी द्या'
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे नांदोरी चौकात प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली. पीडित तरुणी ही ४० टक्के भाजली असून तिच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा-निर्भया प्रकरण : दोषी अक्षय ठाकुरची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गाखरे यांच्यासह कारंजा शहरात महिलांनी तहसील कार्यालयात एकत्र येत काळी फित बांधून निषेध व्यक्त केला. हे कृत्य अत्यंत घृणास्पद आहे. अशा मानसिकतेच्या व्यक्तीला तशाच यातना देऊन फाशी द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया सरिता गाखरे यांनी व्यक्त केली.
यावेळी समुद्रपूर तालुक्यात सिंदी रेल्वे, देवळीतील वायगाव येथेही बंद पुकारून मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी कारंजा येथील मोर्चात जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, जिल्हा परिषद सदस्य सुरेश खवशी, माजी जिल्हा परिषद सभापती मंगेश खवशी, हेमंत बन्नगरे यांच्यासह महिलांचा सहभाग होता.