वर्धा-घरमालकानेच भाडेकरूच्या घरात चोरी केल्याची अजब घटना घडली आहे. हिंगणघाट शहरातील न्यू यशवंतनगर येथे भाड्याने राहणाऱ्या महिलेच्या घरात ही चोरी झाली आहे.
पपीन रामटेके, पोलीस उप निरीक्षख सध्या शहरात सतत चोरीच्या घटना घडत आहेत. सततच्या घरफोडीच्या घटना पाहता ही चोरीही याच चोरट्यांनी केली असावी असा संशय होता. मात्र, पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, घरमालकानेच ही चोरी केल्याची धक्कादायक कबुली दिली. प्रियंका जिवतोडे असे भाड्याने राहत असलेल्या महिलेचा नाव आहे, तर, राकेश नाल्लावार असे घरमलकाचे नाव आहे.
मागील आठवड्यात हिंगणघाट शहरात तीन दिवसात पाच घरफोडीच्या घटना घडल्या होत्या. यात हिंगणघाट पोलिसांनी पाचही घरफोड्या उघडकीस आणल्या आहे. यातील चार घरफोड्या करणारे हे नागपूर येथील चोर जेरबंद करण्यात आले. मात्र, याच दरम्यान यशवंत नगर येथील घरातील चोरीची कबुली न मिळाल्याने संशय घेत चौकशी केली. यात स्वतः घरमालकाने आपल्या भाडेकरूच्या घरी चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
वडनेर येथील प्रियंका जिवतोडे या हिंगणघाटमध्ये राकेश नल्लावार यांच्या घरी भाड्याने राहत होत्या. ३ ऑगस्ट रोजी प्रियंका आपल्या घरी कुलूप लावून वडनेरला गेल्या होत्या. वडनेर येथून परत आल्यावर 7 तारखेला ही चोरीची घटना उघड झाली. यात ४ ग्राम सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे पैंजण असा एकूण १६ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले. यात संशयावरून चार दिवसांपासून बाहेर गेलेल्या घरमालकाची देखील पोलिसांनी विचारपूस सुरू केली. यावेळी घरमालकावर संशय पक्का झाल्याने त्याची कसून चौकशी केली, त्यात त्याने चोरीची कबुली दिली. यात आरोपी घरमालक याने चोरलेले ऐवज हे यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील सोनार विनोद खेरा यास विकले असल्याची कबुली दिली. यानुसार चोरीतील १६ हजार किमतीचा सर्व माल हस्तगत करण्यात आला. दारूच्या व्यवसनातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत असून पुढील तपास सुरू आहे.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक बसवराज तेली , अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे, पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात पीएसआय पपीन रामटेके, गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार सुनील पाऊलझाडे, निलेश तेलरांधे, पंकज घोडे, सचिन भारशंकर, तसेच सायबर सेलचे दिनेश बोथकर यांनी केली.