महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'इमारत नवी बांधता येईल, मात्र गरीबांचे नष्ट झालेले अभिलेख कसे मिळवणार?'

वर्धा जिल्ह्यातील आर्वीत अचानक आग लागून निबंधक कार्यालय जळून खाक झाले. पालकमंत्री सुनील केदार यांनी या घटनेची पाहणी केली. तसेच नागरिकांनी जी काही कागदपत्रे असतील, ती तातडीने दुय्यम निबंधक व तहसील कार्यालयाला उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.

Guardian Minister Sunil Kedar ,  Sunil Kedar visited burnt registrar office aarvi ,  registrar office aarvi ,  निबंधक कार्यालय आर्वी ,  आर्वीत निबंधक कार्यालयाला आग
सुनिल केदार

By

Published : May 16, 2021, 7:16 AM IST

वर्धा - आर्वी तहसील कार्यालय परिसरात अचानक लागलेल्या आगीत निबंधक कार्यालय जळून खाक झाले. गुरुवारी झालेल्या घटनेनंतर पालकमंत्री सुनील केदार यांनी घटनेची पाहणी केली. निबंधक कार्यालयात गाव खेड्यातील माणसांच्या जमिनी, शेती आणि मालमत्तेच्या नोंदी असतात. ते अभिलेख या आगीत नष्ट झाले आहेत. याची खरी झळ गरीब माणसाला बसेल. त्यामुळे नागरिकांनी जी काही कागदपत्रे असतील, ती तातडीने दुय्यम निबंधक व तहसील कार्यालयाला उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. ते वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना आर्वीत बोलत होते.

नागरिकांनी कागदपत्र दिल्यास त्या आधारे अभिलेख पुनर्स्थापित करण्याचे काम तातडीने मार्गी लावता येईल, असे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री केदार म्हणाले. ही आगीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या आगीत पूर्णतः नुकसान झालेली इमारत आणि फर्निचर नव्याने उभारता येईल, मात्र यात नष्ट झालेला रेकॉर्ड मिळवताना अतिशय त्रास होणार आहे. हे कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात दुसऱ्या इमारतीत सुरू करण्यासाठी आवश्यक साहित्य आणि संगणक तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते यावेळी म्हणाले.

आर्वीच्या जळालेल्या निबंधक कार्यालयाला पालकमंत्री सुनिल केदार यांनी दिली भेट..

तहसील कार्यालय दोन महिन्यांच्या आत नवीन इमारतीत हलविण्यात येईल, नवीन इमारतीचे 90 टक्के काम झाले असून उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. आर्वी तहसील कार्यालयाला लागलेल्या आगीची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आणि विद्युत विभागाला दिलेत. तसेच नुकसानीच्या मूल्यांकनाबाबत सार्वजनिक बांधकाम उपअभियंता यांना सूचना दिल्या आहे.

या कार्यालयाला लागलेल्या आगीत दुय्यम निबंधक कार्यालय संपूर्ण जळाले असून निवासी नायब तहसीलदार आस्थापना, रोजगार हमी शाखा, पुनर्वसन शाखेतील अभिलेख आगीमध्ये पूर्णत: नष्ट झाले. तर नैसर्गिक आपत्ती, अभिलेखागार, नायब नाझर शाखा, तहसीलदार यांचेकडील कार्यवाहीची प्रकरणे, पुरवठा शाखा व इतर शाखेतील काही अभिलेख या आगीत अंशतः नष्ट झाल्याची माहिती उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांनी दिली. यावेळी आमदार दादाराव केचे, माजी आमदार अमर काळे, तहसीलदार विद्याधर चव्हाण, तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आर्वी उपजिल्हा रुग्णालयात 100 आयसीयू बेड्स सुरू करणार -

कोरोनाचा संसर्ग आता गावागावात होत असून तिसरी लाटेच्या तयारीसाठी आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात 100 आयसीयू बेड्स सुरू करण्याचा प्रयत्न राहील. तसेच या वर्षभरात सर्व ग्रामीण रुग्णालये अत्याधुनिक करण्यात येतील असे पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी सांगितले. यामुळे आर्वी येथील रुग्णांना अमरावती किंवा वर्धा येथे जाण्यासाठी होणारा त्रास कमी होईल आणि रुग्णांना तातडीने उपचार मिळतील.

हेही वाचा -कोल्हापूर पोलिसांनी २५ दिवसात वसूल केला तब्बल १ कोटीचा दंड; निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details