वर्धा - आर्वी येथील सात वर्षीय मुलाला मारहाण करत गंभीर इजा पोहोचवण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशी करावी. न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या आरोपीला जमीन भेटू देऊ नये, यासाठी प्रयत्न करावे. तसेच तपास योग्य दिशेने करून पिडीत बालकाची आणि कुटुंबीयांची बाजू न्यायालयासमोर सक्षमपणे मांडावी. त्यांना न्याय मिळण्यासाठी आणि आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, यासाठी सरकार पीडित कुटुंबीयांच्या पाठीशी असल्याची हमी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकर कांबळे यांनी पीडित बालकाच्या पालकांना दिली.
वर्ध्यातील आर्वी येथील सात वर्षाच्या बालकाला आरोपीने मंदिरातील दान पेटीतील पैसे चोरीचा आळ घेऊन तापत्या फरशीवर नागडे करून बसवले. त्यामुळे बालकाचा पार्श्वभाग गंभीररीत्या भाजला. मागील आठ दिवसांपासून पीडित चिमुकल्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मधुकर कांबळे यांनी पिडीत बालकाच्या कुटुंबाच्या घरी भेट देऊन घटनेची चौकशी केली आणि कुटुंबीयांना धीर दिला. तसेच यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
सुरुवातीला कांबळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पीडित मुलाच्या घरी जाऊन पाहणी केली. कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीची पाहणी करत घटनाक्रम जाणून घेतला. त्यांनतर विश्रामगृहात पत्रकार तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदिप मैराळे यांच्याकडून तपासातील प्रगतीबाबत माहिती जाणून घेतली. रक्त तपासणी अहवाल आणि फॉरेन्सिक अहवाल प्राप्त होताच पुढील तपास केला जाईल. या प्रकरणात कोणाचाही दबाव न घेता पारदर्शकपणे सखोल तपास करावा. आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून इतरांवर जरब बसेल, असे त्यांनी यावेळी म्हटले.