वर्धा - हिंगणघाट हरतालिका येथे विसर्जन करताना वणा नदीत तोल जाऊन पडल्याने चार जण वाहून गेले आहेत. यामध्ये दोन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. वाहून जात असलेल्या एका महिलेला पोलीस रामदास चाकोले यांनी बाहेर काढले होते. मात्र, रुग्णालयात दाखल केले असता या महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले. रिया रणजित भगत वय 35 असे मृत महिलेचे नाव आहे. तर, तिघे जण अद्यापही बेपत्ता आहेत.
हरतालिका विसर्जन करताना चार जण नदीत बुडाले; एका महिलेचा मृत्यू तर 3 जण बेपत्ता
हिंगणघाट हरतालिका येथे विसर्जन करताना वणा नदीत तोल जाऊन पडल्याने चार जण वाहून गेले आहेत. यामध्ये दोन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. एका महिलेचा मृतदेह सापडला असून 3 जण अद्यापही बेपत्ता आहेत.
घरी हरतालिका पूजन करून शास्त्री वार्डातील काही महिला वणा नदीकाठावर गौरी विसर्जनासाठी गेल्या होत्या. यावेळी रिया यांच्या सोबत त्यांचा मुलगा अभि (वय 10) आणि मुलगी अंजना(13) होते. अभि वाहून जात असल्याचे पाहताच बहीण अंजना त्याला वाचवण्यासाठी धावली. तिही पाण्यात बुडत असल्याचे दिसताच तिची आई रियाने धाव घेतली. या तिघांना वाहताना पाहून शेजारच्या दिपाली मारोती भटेने यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यासुद्धा पाण्यात वाहून गेल्या. हा सर्व प्रकार पाहून, उपस्थित महिलांनी आरडाओरडा करण्यास सुरूवात केली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. राष्ट्रीय महामार्गावरील वणा नदी पुलाजवळ एक महिला वाहून जात असल्याचे त्यांना दिसले. त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता पोलीस रामदास चाकोले यांनी नदीच्या पाण्यात उडी मारून रिया भगतला पाण्याबाहेर काढले. त्यावेळी त्या जिवंत होत्या. मात्र, उपचारासाठी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, स्थानिक भोई समाजाच्या मदतीने पोलीसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. तसेच, एनडीआरएफच्या चमुलाही पाचारण करण्यात आले आहे.