वर्धा - येथे भाजप-काँग्रेसच्या वतीने लोकसभा उमेदवारी दाखल करण्यात येणार आहे. दोन्ही पक्षांकडून अधिकृत उमेदवार नामांकन अर्ज दाखल होतील. पक्षातील प्रमुख नेते आमदार आणि पदाधिकाऱ्यांसह शक्तिप्रदर्शन करत हे नामांकन अर्ज दाखल केले जाणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे हे नामांकन दाखल करण्याचा काँग्रेस आणि भाजपने शुक्रवारचाच मुहूर्त केला जाणार आहे. नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी दोन्ही पक्षांकडून मोठा गाजावाजा करत शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
वर्ध्यात भाजप-काँग्रेस शक्तिप्रदर्शन भाजपतर्फे रामदास तडस उमेदवार म्हणून नामांकन अर्ज भरणार आहेत. आज अनेकांत स्वाध्याय मंदिर येथून शक्तिप्रदर्शनास सुरवात करत नामांकन अर्ज भरण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते निघणार आहेत. यावेळी अर्थमंत्री आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्यमंत्री प्रवीण पोटे, आमदार पंकज भोयर, समीर कुणावर, संजय बोंडे यांच्यासह भाजप शिवसेना आणि रिपाई गटाचे पदाधिकारी उपस्थित राहतील.
काँग्रेसकडूनही आजच जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयापासून शक्तिप्रदर्शन सुरू होईल. यावेळी लोकससभा उमेदवार चारुलता टोकस यांच्यासोबत आमदार रणजित कांबळे, अमर काळे, वीरेंद्र जगताप, यांच्यासह अनेक पदाधिकारी जेष्ठ नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांची गर्दी असणार आहे.
वर्ध्यात भाजपच्या वतीने विद्यमान खासदार रामदास तडस यांनाच उमेदवारी जाहीर करत दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी उमेदवारीसाठी माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुत्र सागर मेघे यांच्या नावाची चर्चा होती. काल खासदार तडस यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदीही पहिली सभा वर्ध्यात घेणार आहेत. २०१४ मध्येही महात्मा गांधींच्या सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन प्रचार सभेला सुरवात करण्यात आली होती.
रामदास तडस आणि चारुलता टोकस यांच्यासह इतर लोकसभेचे उमेदवार नामांकन अर्ज दाखल करण्याचीही शक्यता आहे. यासाठी १०० ते १५० पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. काँग्रेसकडून दुपारी १२ च्या सुमारास नामांकन अर्ज दाखल केला जाईल. त्यांनतर १ च्या सुमारास भाजपचे उमेदवार नामांकन दाखल करतील. यावेळी काँग्रेसला हुतात्मा चौकात थांबा असणार आहे. तर, भाजपसाठी पोलीस मैदानावर थांबा असेल. येथून उमेदवारासह चार जण जाऊन नामांकन दाखल करतील अशी माहिती मिळाली आहे.