वर्धा - हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातातील पीडित प्राध्यापिकेच्या कुटुंबीयांशी रविवारी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे प्रमुख समन्वयक आबासाहेब पाटील यांनी भेट घेतली. पीडितेच्या कुटुंबीयांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता लवकरात लवकर न केल्यास २७ आणि २८ फेब्रुवारीला मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला.
एकतर्फी प्रेमातून वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये २४ वर्षीय प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून पेटवून देण्यात आले होते. त्यात पीडितेचा मृत्यू झाल्याने सर्वच स्तरांमधून रोष व्यक्त करण्यात आला. या घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांशी भेट घेवून मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे सांत्वन केले. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने कठोर कायदे करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आरोपींना सुरक्षा देऊन कारागृहात ठेवले जाते. तीच सुरक्षा महिलांना का देत नाही, असा सवालही यावेळी करण्यात आला. आरोपीला शिक्षा देणे शासनाला जमत नसेल, तर आरोपीला आमच्याकडे द्या, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांची आहे. हीच भूमिका आमचीही असल्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.