वर्धा- समुद्रपूर तालुक्यातील वायगाव गोंड येथे पत्नीने पतीची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना काल रात्री (३१ ऑगस्ट) घडली. शेती विकण्याच्या कारणावरून ही हत्या झाली असून यात गंभीर जखमी झाल्याने पतीचा मृत्यू झाला आहे.
माहिती देताना पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार मुरलीधर पिजकाटे, असे मृत व्यक्तीचे नाव असून नंदा असे हत्या करणाऱ्या पत्नीचे नाव आहे. मुरलीधर यांची मुलगी ही हृदयरोगाने आजारी असल्याने तिच्या उपचारासाठी पैशांची गरज होती. यामुळे शेती विकून टाकायचा आग्रह मुरलीधर करत होते. मुरलीधर यांना दारूचे व्यसन होते. ते नेहमी दारू पिऊन घरात येऊन पत्नीला व मुलीला मारहाण करायचे. ते शेती विकून पैसे दारूत उडवतील या भितीने त्यांच्या पत्नी नंदा या शेती विकायला विरोध करत होत्या.
काल (सोमवारी) सायंकाळी याच कारणावरून दोघा पती-पत्नीमध्ये वाद झाला. यावेळी संतप्त नंदा यांनी पती मुरलीधर यांना काठीने मारहाण केली. यात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेची माहिती स्वप्नील घोडे याने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून दिली होती. यानंतर समुद्रपूर पोलिसांना माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी भिमराव टेळे, समुद्रपूरचे ठाणेदार हेमंत चांदेवार, पोलीस उपनिरीक्षक दिपेश ठाकरे, यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. आरोपी पत्नी नंदा पिजकाटे हिला अटक करण्यात आली असून पुढील तपास समुद्रपूर पोलीस करत आहे.
हेही वाचा-सेवाग्राम रुग्णालयात बेड न मिळाल्याने कोरोनाबाधिताला झोपावे लागले जमिनीवर