महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मत फुकट घालवू पण शिवसेनेला कोंडीत पकडू, महापालिकेत भाजपाची रणनीती

मुंबई महापालिकेचे आर्थिक प्रस्ताव मंजूर होणाऱ्या स्थायी समितीवर भाजपाने अभ्यासू नगरसेवकांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती करताना भाजपाने आपल्या मतदानाचा अधिकार नसलेल्या सदस्याचीही नियुक्ती केली आहे. यामुळे भाजपाने स्थायी समितीत मत फुकट गेले तरी चलेल पण शिवसेनेला कोंडीत पकडयाचे अशी रणनिती आखल्याचे स्पष्ट होत आहे.

File photo
File photo

By

Published : Sep 28, 2020, 9:02 PM IST

मुंबई -राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर मुंबई महापालिकेत भाजपाने विरोधात बसण्याची तयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेचे आर्थिक प्रस्ताव मंजूर होणाऱ्या स्थायी समितीवर भाजपाने अभ्यासू नगरसेवकांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती करताना भाजपाने आपल्या मतदानाचा अधिकार नसलेल्या सदस्याचीही नियुक्ती केली आहे. यामुळे भाजपाने स्थायी समितीत मत फुकट गेले तरी चलेल पण शिवसेनेला कोंडीत पकडयाचे अशी रणनीती आखल्याचे स्पष्ट होत आहे.

मुंबई महापालिकेचा कारभार सभागृह, वैधानिक, विशेष व प्रभाग समित्यांच्या माध्यमातून चालवला जातो. या समित्यांचे अर्धे सदस्य दरवर्षी निवृत्त होतात. वैधानिक व विशेष समित्यांचे अर्धे सदस्य दरवर्षी निवृत्त होतात. त्यांच्या जागी पालिकेत नगरसेवक निवडून आलेले राजकीय पक्ष आपले सदस्य नियुक्त करतात. या नावांची घोषणा पालिका सभागृहात केली जाते. त्यानंतर समितीचे अध्यक्ष निवडले जातात. शिक्षण, स्थायी, बेस्ट, सुधार समितीसह अन्य समित्यांच्या निवडणुकांना ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी शिक्षण समितीच्या ११, स्थायी समितीच्या १३, सुधार समिती १३ व बेस्ट समिती सदस्यांची नावे सोमवारी ऑनलाईन पद्धतीने झालेल्या सभागृहात महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केली.

पालिकेचे आर्थिक निर्णयाचे प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर केले जातात. यामुळे या समितीला विशेष महत्व आहे. या समितीवर सत्ताधारी शिवसेनेने माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची नियुक्ती केली आहे. तर भाजपाकडून अभ्यासू नगरसेवक असलेले भालचंद्र शिरसाट व उज्वला मोडक यांची नियुक्ती केली आहे. तसेच आशा मराठे यांची नियुक्ती केली आहे. शिरसाट हे भाजपाचे स्वीकृत नगरसेवक आहेत. त्यांना मतदानाचा अधिकार नसल्याने ते कोणत्याही प्रस्तावावर मतदानावेळी मतदान करू शकणार नाहीत. मात्र ते स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडू शकतात. यावरून भाजपाने येत्या काळात शिवसेनेला कोंडीत पकडण्याची रणनीती आखल्याचे स्पष्ट होत आहे.

या दिवशी होणार निवडणुका -

पालिकेच्या ४ वैधानिक तर ६ विशेष समित्या आहेत. या समित्यांची निवडणूक प्रक्रिया ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ५ ऑक्टोबरला शिक्षण आणि स्थायी समितीची, ६ ऑक्टोबरला बेस्ट आणि सुधार समितीची, ७ ऑक्टोबरला स्थापत्य शहर आणि स्थापत्य उपनगर समितीची, ८ ऑक्टोबरला सार्वजनिक आरोग्य आणि बाजार व उद्यान समितीची, ९ ऑक्टोबरला विधी आणि महिला व बालविकास समितीची तर १४ पासून १६ ऑक्टोबरपर्यंत १७ प्रभाग समित्यांची निवडणूक होणार आहे. स्थायी आणि शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी ३० सप्टेंबरपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत महापालिका चिटणीस संगीता शर्मा यांच्याकडे अर्ज दाखल करावयाचा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details