ठाणे- कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या दोन स्थायी समिती सदस्यांनाच कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने महापालिकेत खळबळ उडाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेले हे सदस्य स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित होते. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य दोन स्थायी समिती सदस्यांना ही 14 दिवस विलगीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. मागील काही दिवसांत सातत्याने दररोज अडीचशे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. आजपर्यंत कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 3 हजार 700च्या घरात गेली आहे. ठाण्यातील एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आता हेच लोण कल्याण-डोंबिवली शहरातही पसरू लागले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका स्थायी समितीमध्ये सर्वपक्षीय 16 सदस्य आहेत. 17 जून रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हे दोन्ही नगरसेवक उपस्थित होते.