ठाणे(मीरा-भाईंदर) -कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शन बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. मात्र, या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू आहे. बाजार भावापेक्षा दुप्पट भावाने हे इंजेक्शन विकणाऱ्या दोन व्यक्तींना मिरारोड पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. या दोन आरोपींकडून 21 हजार 600 रुपये किंमतीची ४ इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत.
कोरोनामुळे नागरिक हैराण झाले आहेत. जर एखाद्याला कोरोनाची लागण झाली असेल तर रुग्णालयातून विविध इंजेक्शन आणि गोळ्यांची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांकडे केली जाते. त्यामध्ये रेमडेसीवर १०० एमजी या इंजेक्शनचाही समावेश आहे. हे इंजेक्शन बाजारात उपलब्ध आहे. मात्र, त्याचा काळाबाजार सुरू असल्याने गरजेपेक्षा जास्त किंमत नागरिकांना मोजावी लागत आहे.