ठाणे- कृषी पथकासह पोलिसांनी भिवंडी तालुक्यातील मौजे वळगांव हद्दीतील पद्मावती कंपाऊंडमधील रॉयल वेअर हाऊस येथील गोदामावर छापा टाकून निमकोटेट खताचा साठा जप्त करून गोदामाला सील केले होते. मात्र, गोदाम मालकांनी जप्त खताचा साठा परस्पर चोरून विक्री केल्याची घटना समोर आली. त्यामुळे गोदाम मालकांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोदाम मालक बापूराव नारायण भोसले व अमित झंवर, असे गुन्हा दाखल झालेल्या गोदाम मालकांची नावे आहेत.
या दोघा आरोपींनी स्वतःच्या फायद्यासाठी संगनमताने शेतकऱ्यांना पुरवण्यात येणारा निम कोटेट युरिया खताच्या प्रत्येकी 50 किलो वजन असलेल्या सुमारे 1 लाख 90 हजार 91 रुपये किंमतीच्या 121 गोणींचा (पोते) साठा वळ येथील वेअर हाऊस आर / एफ - 18 या गोदामात साठवून ठेवला होता. या खताचा वापर औषध, रंग निर्मिती व दूध भेसळीसाठी केली जात असल्याची माहिती माहिती कृषी विभागाला मिळाल्याने कृषी अधिकाऱ्यांनी 25 नोव्हेंबर रोजी छापा टाकून येथील खताचा साठा जप्त करून खताचा नमूना तपासणीसाठी विशेष रसायन शास्त्रज्ञ, खत नियंत्रण प्रयोग शाळा, नाशिक येथे पाठविला होता.