ठाणे -भिवंडी तालुक्यातील सरवली येथे ठाणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडली. महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे खजिनदार सुरेश पाटील यांच्या हस्ते या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. सरवली येथील हनुमान तालीम संघ आणि साई श्रद्धा क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने काशिनाथ चौधरी यांच्या स्मरणार्थ या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा चाचणी कुस्ती स्पर्धा संपन्न
तीन दिवसांच्या या स्पर्धेत ठाणे, पालघर, नवी मुंबई, मीरा भाईंदर येथील शेकडो मल्लांनी सहभाग घेतला होता. प्रौढ गटात १६०, कुमार गटात १०२ महिला आणि सब ज्युनियर गटात ५० कुस्तीपटूंनी आपले कौशल्य पणाला लावले. माती आणि मॅटवर या दोन प्रकारांमध्ये सामने खेळवले गेले.
हेही वाचा - 'आता तरी मंत्रीमंडळ विस्तार करा'; फडणवीसांची बदलापूरमधून टोलेबाजी
स्पर्धेतील सांघिक विजेतेपद कोनगाव येथील कलानिकेतन संघाने पटकावले. एकूण दहा वजनी गटातील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या गौरव करण्यात आला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारे कुस्तीपटू हे २ जानेवारीला पुणे येथे होणाऱ्या राज्य निवड चाचणी स्पर्धेत खेळण्यासाठी पात्र ठरले आहेत.
ठाणे जिल्ह्यातील कुस्तीपटू चमकदार कामगिरी करत आहेत. या खेळाडूंना शासकीय नोकरी मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. या स्पर्धेतून असंख्य कुस्तीपटू पुढे येत आहेत, ही समाधानाची बाब असल्याची प्रतिक्रिया राज्य कुस्ती संघटनेचे खजिनदार सुरेश पाटील यांनी दिली.
स्पर्धेत सब ज्युनियर महिला आणि मुलींच्या गटात भाईंदर येथील ऐश्वर्या सनस, मनीषा शेलार, काजल सावंत(पालघर), प्रणाली भंडारी (चौधरपाडा), विजया पाटील(काल्हेर), सारिका महाले(अंबरनाथ) या मुलींनी बाजी मारली. ग्रीको-रोमन गटात सागर भोईर, सागर डिंगोरे, पंकज कराळे, आवेश चौधरी, जयेश पाटील, अजय भोईर, महेंद्र म्हात्रे, अल्पेश चौधरी, वैभव माने, दिपेश पाटील, कार्तिक वाकडे, भूषण राऊत यांनी प्रथम क्रमांक मिळवले. विवेक भंडारी, स्वप्नील पाटील, मंगेश पाटील, सागर पवार यांनी विविध वजन गटात प्रथम क्रमांक पटकावले आहेत.
तीन दिवस चाललेल्या या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ठाणे जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी विनोद पाटील, तांत्रिक कमिटीचे प्रमुख श्रीराम पाटील, पंच कमिटी यांनी परिश्रम घेतले.