ठाणे - येथील कॅडबरी जंक्शन येथे टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी टेम्पो चालकाला नौपाडा पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. जॉन सायमन श्रीसुंदर (वय 34, रा. शेलार पाडा कोलबाड, ठाणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 16 फेब्रुवारी रोजी पहाटे 1.30 वाजण्याच्या सुमारास जॉन सायमन श्रीसुंदर हे त्यांच्या मोटारसायकलीवरून मुंबई ते नाशिकच्या दिशेने पूर्व द्रूतगती मार्गावरुन जात होते. यावेळी नबीसाहब महंमद मुल्ला मोहमम्मद मुल्ला (वय 29) रा. सानपाडा, नवी मुंबई, ठाणे याचा दुधाचा टेम्पो भरघाव वेगाने खोपट बाजूकडून वर्तकनगरच्या दिशेला जात होता. दरम्यान कॅडबरी जंक्शनजवळ या टेम्पोची जॉन यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक बसली. या धडकेमध्ये टेम्पोच्या चाकाखाली येऊन जॉन गंभीर जखमी झाले.
हेही वाचा -कल्याण-शीळ रस्त्यावर उसळला आगडोंब, झोपड्यांसह झाडांना झळ
घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम.पी. सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद मोरे आणि बीट मार्शल पोलीस नाईक धुरी यांनी घटनास्थळ गाठून तातडीने जॉन यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. घटनास्थळी जॉनच्या पॅन्टच्या खिशात मिळालेल्या आधारकार्डच्या आधारे ओळख पटली. यानंतर, पोलिसांनी त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकाच्या स्वाधीन केला. याप्रकरणी टेम्पोचालक नवीसाहब याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पेालीस निरीक्षक सोनवणे पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा -'पुढे महाराष्ट्राची निवडणूक म्हणजे भाजपचा एकट्याचा लढा असेल'