ठाणे- पंडीत दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय बेस्ट प्रॅक्टीसेस म्हणून 'सिग्नल शाळा' प्रकल्पाची केंद्रशासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून निवड करण्यात आली आहे. महानगरपालिका व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ही शाळा सुरू आहे. देशातील 1 हजार प्रयोगांमधून निवडण्यात आलेल्या 200 प्रकल्पांमध्ये या शाळेचा प्रकल्प निवडण्यात आला आहे.
12 फेब्रुवारीला दिल्लीत उपराष्ट्रपती भवनात उपराष्ट्रपती व केंद्रीय सांस्कृतिक मंत्री यांच्या उपस्थितीत सिग्नल शाळेसह देशभरातील अंत्योदय पुरस्कार प्राप्त उपक्रमांवर आधारित पुस्तक प्रकाशित होत आहे. या कार्यक्रमात सिग्नल शाळेचा देखील अंतर्भाव करण्यात आला आहे.
'अंत्योदय बेस्ट प्रॅक्टीस' म्हणून 'सिग्नल शाळा' प्रकल्पाची निवड हेही वाचा - ठाण्यातील मोरीवली एमआयडीसी परिसरातील अगरबत्ती कंपनीला भीषण आग
ठाण्यातील विविध सिग्नलवर व्यवसाय करणारी अथवा भिक्षेकरी असलेली मुले शिक्षणाच्या मूळ प्रवाहात यावी, यासाठी ठाणे महानगरपालिकेने 3 वर्षांपूर्वी समर्थ भारत व्यासपीठ संस्थेच्या सहकार्याने देशातील पहिली सिग्नल शाळा तीन हात नाका सिग्नल पुलाखाली सुरू केली. शाळेच्या 3 वर्षाच्या शैक्षणिक प्रवासात 2 मुले दहावी उत्तीर्ण झाली. जवळपास 42 मुले शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सिग्नल शाळेचा प्रकल्प पथदर्शी प्रकल्प राबविण्यात यावा, याबाबत विधानसभेत घोषित केले होते. प्रमाणभूत भाषेच्या अडचणी, कुपोषण, अंधश्रद्धा, भटकी जीवनशैली, बालकामगार, आर्थिक अस्थिरता, सामाजिक व सांस्कृतिक अनुशेष या अडचणींवर मात करत गेल्या 3 वर्षात सिग्नल शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुख्य धारेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांइतपत शैक्षणिक गुणवत्ता धारण केली आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसोबतच पालकांमधील व्यवसनाधिनता, कुटुंबनियोजनाचा अभाव, कौटुंबिक स्थिरता, आदी प्रश्नांवर देखील सिग्नल शाळेच्या माध्यमातून यशस्वी उत्तर शोधले गेले. गेल्या 3 वर्षात विविध आंतरराष्ट्रीय माध्यमांनी सिग्नल शाळेच्या प्रयोगाला उचलून धरले. केंद्रशासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयासाठी इंडियन सोशल रिस्पॉन्सिबिलीटी नेटवर्क या संस्थेने देशभरातील 1 हजाराहून उपक्रमांचा अभ्यास करुन निवडक 200 प्रकल्प सर्वोत्तम अंत्योदय बेस्ट प्रॅक्टीसेस म्हणून निवडले. या 200 प्रकल्पांमध्ये सिग्नल शाळेची निवड झाल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. आता सिग्नल शाळेच्या या प्रकल्पाचा समावेश राष्ट्रीय अहवालात केला जाणार असून सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून देशभर या प्रकल्पाच्या प्रचार, प्रसिद्धी व सक्षमीकरणासाठी विविध मार्गांनी प्रयत्न केले जाणार आहेत.
हेही वाचा -कुडाच्या झोपडीत भरते आदिवासी विद्यार्थ्यांची शाळा.. शिक्षण विभाग उदासीनच!
अंत्योदय बेस्ट प्रॅक्टीसेस पुरस्कार प्राप्त झाल्यावर आयुक्त जयस्वाल यांनी शिक्षण विभाग व समर्थ भारत व्यासपीठाच्या चमूचे कौतुक केले आहे. या निवडीमुळे ठाणे महानगरपालिकेचे नाव राष्ट्रीय स्तरावर गौरविले गेल्याची भावना व्यक्त केली आहे. दिल्लीत उपराष्ट्रपती भवनात 12 फेब्रुवारीला उपराष्ट्रपती वैंकया नायडू , केंद्रीय सांस्कृतिक मंत्री ओमप्रकाश सचलेचा व खासदार विनय सहस्त्रबुध्दे यांच्या उपस्थितीत सिग्नल शाळेसह देशभरातील अंतोदय पुरस्कार प्राप्त उपक्रमांवर आधारित पुस्तक प्रकाशित होत आहे. यामुळे आता सिग्नल शाळेचा प्रयोग राष्ट्रीय पातळीवर धोरण म्हणून स्विकारण्याच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे अशी प्रतिक्रिया समर्थ भारत व्यासपीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत यांनी व्यक्त केली.