ठाणे -शहरात वाहने चोरणाऱ्यांचा सुळसुळाट वाढला असतानाच वागळे इस्टेट पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये ठाण्यातील रिक्षा चोरणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. संजय मंचेकर (25, रा. घाटकोपर) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून 1 लाख 60 हजार किंमतीच्या दोन रिक्षा हस्तगत केल्या आहेत.
ठाण्यात रिक्षाचोरांचा सुळसुळाट; एका चोरट्यास अटक
पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये ठाण्यातील रिक्षा चोरणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. ठाणे शहरात वाहने चोरणाऱ्यांचा सुळसुळाट वाढला आहे.
वागळे इस्टेट, हाजुरी भागात राहणारे नदीम सय्यद यांची रिक्षा त्यांच्या घराजवळ पार्क करून ठेवली होती. तर अंबिकानगर नं. 2 येथे राहणारे सुरेंद्र प्रभाकर उपाध्याय यांनी त्यांची रिक्षा घराजवळच सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला पार्क करून ठेवली होती.या दोन्ही रिक्षा चोरीला गेल्याची तक्रार संबधितांनी 28 सप्टेंबर रोजी वागळे इस्टेट पोलिसांकडे केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय ढोले, पोलीस निरीक्षक विजय मुतडक (गुन्हे) यांनी सदर गुन्ह्याची गंभीर दखल घेतली. त्यानुसार, वागळे इस्टेट पोलिस ठाण्याचे तपास पथकाचे अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक फड व सहायक पोलीस उपनिरीक्षक आंबेकर यांच्या पथकाने अवघ्या दोन तासांमध्ये रिक्षा चोर मंचेकर या वाहन चोरटयाचा शोध घेऊन अटक केली. तसेच 1 लाख 60 हजारांच्या दोन रिक्षा देखील हस्तगत करण्यात आल्या.