ठाणे- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेली अडीच महिने रिक्षा बंद होते. परंतु, आता लाॅकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. ठाण्यात तुरळक प्रमाणात रिक्षा धावू लागल्यात. यामुळे रिक्षाचालकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र, नागरिक अजूनही कामानिमित्तच घराबाहेर पडत असल्याने रिक्षाचालकांना प्रवासी मिळणे कठीण झाले आहे.
'घर चालवणं अवघड झालं होतं'.. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गेली अडीच महिने लॉकडाऊन सुरू होता. आता अनलाॅक 1 सुरू झाला आहे. त्याअंतर्गत रिक्षाचालकांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच काही कार्यालये, छोटी-मोठी व्यवसायही सुरू झाली आहेत. त्यामुळे ठाण्यातील महत्वाच्या नाक्यावर रिक्षा धावू लागल्या आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जी नियमावली आहे, त्याचे आम्ही तंतोतंत पालन करतोय, आम्ही स्वत: तोंडाला मास्क लावतो आणि प्रवाशांनाही मास्क लावण्यास सांगतो. त्याच बरोबर दोनच प्रवाशी रिक्षात घेतो. त्यातही आम्ही अंतर ठेवण्यास सांगतो. गेली अडीच महिन्यांपासून आम्ही घरी आहोत. व्यवसाय बंद असल्याने आमचे खाण्याचे हाल झालेत. घर कसे चालवायचे हा मोठा प्रश्न आमच्या समोर होता. परंतु, हळूहळू आता आम्ही रिक्षा चालू केल्यात, असे रिक्षाचालकांनी सांगितले.
लॉकडाऊनचा काळ फार वाईट..
रिक्षा चालक म्हणजे दिवसभर मेहनत करायची आणि त्यातून आपल्या कुटुंबाला पोसायचे. शिकणारी मुलं, घरखर्च, आजारपण, बँकेचा हफ्ता या सर्व बाबी मागील 3 ते 4 महिन्यात फारच त्रासदायक झाल्या होत्या. व्यवसाय ठप्प झाल्याने दोन वेळसचे जेवण सुद्धा मुश्किलीने केल्याचे रिक्षाचालक सांगतात. ठाण्यात जवाळपास 80 हजार रिक्षा आहेत. या प्रत्येक रिक्षाचा चालक मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाने होरपळून गेला आहे. आता कामाला सुरुवात झाली, पण हवा तसा व्यवसाय ही नाही.