ठाणे - गणेशोत्सवाच्या काळात सर्वत्र मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र, ही मिठाई बनवणाऱ्या भिवंडी तालुक्यातील एका कंपनीवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी छापा टाकला. दरम्यान, या छाप्यात बनावट मावा आणि बनावट चायनीज सॉसचा पर्दाफाश केला आहे. या छाप्यात तब्बल 2 लाख रुपयांचा मावा आणि चायनीजसाठी लागणारे सॉस जप्त करण्यात आले आहे.
भिवंडीत बनावट मावा बनवणाऱ्या कंपनीवर छापा; बनावट चायनीज, सॉसचा पर्दाफाश
भिवंडी तालुक्यातील लोणाड हरणा पाडा येथे एम. एम. फुड्स ही कंपनी विनापरवाना सुरु असल्याची गुप्त माहिती, अन्न सुरक्षा अधिकारी माणिकराव जाधव यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे या कंपनीवर छापा टाकण्यात आला असून तब्बल 2 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
भिवंडी तालुक्यातील लोणाड हरणा पाडा येथे एम. एम. फुड्स ही कंपनी विनापरवाना सुरु असल्याची गुप्त माहिती, अन्न सुरक्षा अधिकारी माणिकराव जाधव यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कोकण विभाग सहायक आयुक्त देसाई व साहायक आयुक्त आर. जी. रुणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली, अन्न सुरक्षा अधिकारी माणिक जाधव आणि शंकर राठोड यांच्या पथकाने एम. एम. फुड्स या कंपनीवर छापा मारला. यात या कंपनीकडे कुठलाही शासकीय परवाना नसल्याचे आढळून आले. तसेच या कंपनीत दूध पावडर, वनस्पती तूप आणि साखरच्या मिश्रणातून हलक्या प्रतीचा बनावट मावा बनवला जात असल्याचे समोर आले आहे.
या माव्यापासून ब्रँडेड कंपनीची बर्फी बनवून ती बाजारात 125 रुपये किलो दराने विक्री करीत असल्याचेही निदर्शनास आले आहे. तर चायनीज खाद्यपदार्थात हमखास आढळणारे डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस, यांचेही उत्पादन सुरू असल्याचे या कंपनीत आढळून आले. यामुळे अन्न सुरक्षा अधिकारी यांनी कंपनी व्यवस्थापक सत्येंद्र नारायण सिंग यांच्याकडे परवान्याची कागदपत्रे मागितली असता, ती दाखवू न शकल्याने अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांनी या कंपनीतून 93 हजार 750 रुपये किमतीचा, 750 किलो बनावट मावा, 30 हजार 600 रुपये किमतीचे 270 किलो डार्क सॉस आणि 45 हजार रुपये किमतीचे 450 किलो रेड चिल्ली सॉस असा एकूण 1 लाख 78 हजार तीनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यानंतर कंपनीला विनापरवाना सुरु ठेवल्या प्रकरणी बंद करण्यात आले आहे.