ठाणे - नॅशनल अर्बन हेल्थ मिशन (एनयूएचएम) अंतर्गत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात 192 नर्सेस कार्यरत आहेत. या सर्वांना किमान वेतन दिले जात नसल्याने सोमवारी प्रशासनाशी चर्चा करून पगारवाढीचे लेखी आश्वासन द्या, अन्यथा कामावर हजर होणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर मंगळवारपासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) मुख्यालयाच्या आवारात आंदोलन सुरू केले होते. अखेर काल (मंगळवार) सायंकाळी उशिरा पालिका प्रशासनाने पगारवाढीचे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.
नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत 192 नर्स कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत 2015 पासून कार्यरत आहेत. त्यांना 8 हजार 640 रुपये पगार दिला जातो. अन्य महापालिकांमध्ये हेच काम करणाऱ्यांना किमान वेतन, वैद्यकीय भत्ते तसेच सध्या कोविडचाही भत्ता दिला जात आहे. केडीएमसीमध्ये मात्र तेथील नर्सेसना किमान वेतन, सुरक्षेची साधने व कोविड भत्ता दिला जात नाही. सध्या तर कोविडच्या कामांमुळे या नर्सेसला साप्ताहिक सुट्टीही दिली जात नाही. यामुळे दाद मागण्यासाठी या नर्सेसनी सोमवारी महापालिका मुख्यालयात धाव घेतली होती. रात्री आठ वाजेपर्यंत त्यांची आयुक्तांसोबत भेट न झाल्याने त्या मंगळवारी पुन्हा महापालिका मुख्यालयात आल्या होत्या. त्यावेळी महानगरपालिकेकडून लेखी आश्वासन न मिळाल्याने त्यांनी ठिय्या आंदोलन आंदोलन सुरू केले होते.