ठाणे -मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यातच शहापूर तालुक्यातील दळखण ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या मार्गाच्या कामासाठी सुरुंग स्फोट करण्यात आल्याने गावातील घरांना तडे जाऊन नुकसान झाले होते. त्यावर दळखण ग्रामपंचायतीचे उपसरपंच भगवान मोकाशी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार दिल्याने नवयुगा कंपनीने ग्रामस्थांच्या घरांच्या नुकसानीची पाहणी करून भरपाई दिली जाणार असल्याचे सांगितले.
भिंतींना तडे गेल्याचे दृष्य हेही वाचा -भिवंडीत भाजी मंडई लगतच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याला भीषण आग
गावकऱ्यांना पूर्वकल्पना न देता सुरुंग स्फोट..
युतीच्या काळातील भाजप सरकारचा ड्रिम प्रोजेक्ट समृद्धी महामार्ग शहापूर तालुक्यातून जात आहे. या महामार्गाचे काम सुरू असल्याने खडकाळ भागाच्या ठिकाणावर सुरुंग लावले जात आहे. परवानगीच्या नावाखाली ठेका कंपनी रात्रीच्या वेळेस कुठलीही पूर्वकल्पना न देता सुरुंग लावून मोठे स्फोट घडवून आणत असल्याने दळखण, बिरवाडी, लाहे या गावच्या ग्रामस्थांच्या घरांना तडे जात असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
घरांच्या जोत्यांसह, भिंतींना तडे..
समृद्धी महामार्गाच्या कामात राज्य सरकारने नेमून दिलेली नवयुगा कंपनी जमिनीच्या भूगर्भात नियंत्रित सुरुंग लावण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर स्फोट करत आहे. हा प्रकार सोमवारी (१ फेब्रुवारी) दळखण गावातील घरांना गेलेल्या तड्यांमुळे उघडकीस आला होता. घरांच्या जोत्यांसह, भिंतींना तडे गेले असून दरवाजांचे कडीकोयंडे तुटले आहेत. अशा रात्री अपरात्री होणाऱ्या सुरुंग स्फोटांमुळे खर्डी गाव परिसरातील दळखण, बिरवाडी, लाहे, चांदा, कुकांबे, धामणी या गावातील नागरिकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे.
मुख्यमंत्र्याकडे तक्रारीनंतर नुकसान भरपाई..
समृद्धी महामार्गाच्या ठेका कंपनीला वारंवार तक्रार करूनही जाणून बुजून या बाबीवर दुर्लक्ष केले जात आहे. शिवाय सुरुंग लावताना नागरिक असो किंवा वन्यजीव याचा कुठलाही विचार न करता नियम तोडून स्फोट घडवून आणले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे, नागरिकांच्या आणि वन्यजिवांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याची माहिती दळखण ग्रामपंचायतचे उपसरपंच भगवान मोकाशी यांनी देत, त्यांनीच मुख्यमंत्र्यांच्या संकेत स्थळावर तक्रार दिल्यानंतर कंपनीने घरांच्या नुकसान भरपाईची तयारी दर्शवल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा -आमदाराच्या फार्म हाऊसमध्ये घुसले चार ‘अजगर'