महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खुलेआम मद्यपान करणाऱ्यांची उघड्यावर लघुशंका; त्रस्त रहिवाशांची पोलिसांसह दारूबंदी खात्याकडे तक्रार

कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या काटई नाक्यावरील एका मद्य विक्री दुकानात मद्यपींची रात्री उशिरापर्यंत झुंबड उडत असते. यामुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधी मद्य विक्री केंद्र बंद करावा, अशी मागणी विजय पाटील यांनी केली आहे.

मद्यविक्री केंद्र
मद्यविक्री केंद्र

By

Published : Dec 27, 2020, 6:58 PM IST

ठाणे -कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या काटई नाक्यावरील एका मद्य विक्री दुकानात मद्यपींची रात्री उशिरापर्यंत झुंबड उडत असते. दुकानाच्या आवारातच तळीराम मद्यपान करतात. एवढ्यावर न थांबता मद्यपी उघड्यावर लघुशंकाही करतात. यामुळे या भागात राहणाऱ्या महिलांची कुचंबणा होते. याबाबत पोलिसांसह दारुबंदी खात्याकडे धाव घेऊन मद्यपी व मद्यविक्री केंद्रामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्तता करावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

रात्री उशिरापर्यत शटर बंद करुनही मागच्या दरातून होते मद्य विक्री

स्थानिक जागरूक रहिवासी विजय पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाणे, राज्य उत्पादन शुल्क विभाग, जिल्हाधिकारी आदींचे तक्रार वजा निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. तक्रारदार विजय पाटील हे ज्या भागात राहतात त्याच ठिकाणी त्यांच्या घराशेजारी ममता बियर शॉप या नावाचे दुकान आहे. मात्र, हे दुकान चालवणाऱ्या मालकाला मद्य विक्री केंद्र चालविण्याबाबत उत्पादन शुल्क विभाग, पोलीस व शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे हे बंधनकारक आहे. परंंतु सर्व नियम धाब्यावर बसवून संबंधित दुकानदार त्याच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना मद्यविक्रीसह बाजूला सर्रासपणे खुलेआम मद्य पिण्यास बेकायदेशीर परवानगी देत असतो. त्यामुळे दुकानावर मद्य विकत घेऊन तेथेच पिणाऱ्या मद्यपींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण, याचा नाहक त्रास परिसरातील रहिवाशांना सहन करावा लागत असल्याचे तक्रारदार विजय पाटील यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे. रात्री 10 वाजता मद्यविक्री केंद्र बंद करण्याची वेळ ठरलेली आहे. तसेच केवळ मद्य विक्री करण्याच्याही सुचना आहेत. मात्र, या दुकानदारकडून पुढील दरवाजा (शटर) बंद करुन मागील दरवाजातून मद्याची केली जाते, असेही तक्रारात म्हटले आहे.

महिलांचा होतोय नाहक त्रास

संबंधित मद्यविक्रीकेंद्राच्या पाठीमागे नागरी वस्ती असून तरुणी, मुलींसह महिलांचा वावर असतो. अशात रहिवाशांच्या घरासमोरच मद्यपान करुन कुटुंबियांतील महिला व मुला-मुलींच्या समक्ष लघुशंका केली जाते. यामुळे मद्यपींच्या किळसवाण्या प्रकारांमुळे मनात लज्जा उत्पन्न होऊन त्याचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

सर्वांना 'मंथली' देतो म्हणत दुकानदाराकडून अरेरावीची भाषा

त्या ठिकाणी मद्यधुंद ग्राहकांचा धिंगाणा घालणे, घरासमोर लघुशंका करणे, विक्षिप्त चाळे करणे, यासारख्या प्रकारांनी या भागातील रहिवासी हैराण झाले आहेत. दुकान मालकाला समजावण्याचा प्रयत्न केला असता तो नेहमी रहिवाशाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. उलट माझी वरपर्यंत ओळख असून पोलीस खाते व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंथली (हप्ते) देत असून तुम्हाला करायचे आहे ते करा, असे म्हणत जीवे मारण्याची धमकीही दुकानदार रहिवाशांना देत असल्याचे विजय पाटील यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे.

मद्यविक्रीचा परवाना रद्द करण्याची मागणी

संबंधित दुकानदारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर सतत त्यांच्याकडून ठार मारण्याची धमकी दिली जाते. यामुळे फौजदारी कारवाई करण्याबरोबरच मद्यविक्रिचा परवाना रद्द करावा, अशीही मागणी केल्याचे विजय पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागातील जबाबदार प्रमुखांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने एकही जबाबदार अधिकारी उपलब्ध होऊ शकला नाही.

हेही वाचा -कल्याण : पत्री पुलाचे काम प्रगतीपथावर, नव्या वर्षात नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्याता

हेही वाचा -रुग्णसंख्या अत्यल्प असतानाही नविन कोविड सेंटर कशासाठी, किरीट सोमैया यांचा सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details