महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात दरड कोसळली; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, 2 बचावले

ठाण्यात दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोघा बहिण-भावाला वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ठाणे
ठाणे

By

Published : Jul 19, 2021, 8:13 PM IST

ठाणे -ठाण्यातील कळवा, घोलाईनगर भागात डोंगरावरील दरड एका घरावर कोसळली. या झालेल्या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक रहिवाशांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आपत्ती विभागाचे कर्मचारी येण्यापूर्वी दोन जणांना सुखरुप बाहेर काढले. त्यानंतर लागलीच या घटनेची माहिती पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन विभागाला देण्यात आली. त्यानुसार बचावकार्य सुरु झाले. मात्र, ढिगाऱ्याखाली अडकल्याने एकाच कुटुंबातील तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या लहान मुलांचा समावेश आहे. तर त्यांच्या कुटुंबातील एक पाच वर्षीय मुलगी आणि अचल यादव (१८) हे बचावले आहेत.

सचिन दुबे- टीडीआरएफ प्रमुख

मृतांची नावे -

1) प्रभू सुदाम यादव (वय 45 वर्षे)

2) विद्धवतीदेवी प्रभू यादव (वय 40 वर्षे)

3) रवीकिशन यादव (वय 12 वर्षे)

4) सीमरन यादव (वय 10 वर्षे)

5) संध्या यादव (वय 3 वर्षे)

जखमींची नावे -

1) प्रिती यादव (वय 5 वर्षे)
2) आचल यादव (वय 18 वर्षे

शनिवारी (17 जुलै) रात्रीपासून बरसत असलेल्या पावसाचा फटका अखेर ठाण्यालाही बसल्याचे दिसून आले आहे. सोमवारी (19 जुलै) दिवसभरात १३३.०७ मीमी पावसाची नोंद झाली. दुपारी कळव्यातील घोलाई नगर भागातील दुर्गा चाळ या भागात दुपारी १२.३० च्या सुमारास दरड कोसळली आणि त्यात एकाच कुटुंबातील सात जण ढिगाऱ्याखाली अडकले. परंतु याची माहिती मिळताच स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना सुखरुप बाहेर काढले. यात ते किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन, टीडीआरएफ, अग्निशमन दलाचे पथक, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर जवळजवळ चार तास बचावकार्य सुरु झाले. त्यानंतर पाचही जणांना बाहेर काढण्यात आले. परंतू त्यांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

परिसरात हळहळ...

दुर्देवाची बाब म्हणजे हे सर्व एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत पती, पत्नी आणि त्यांचा १२ वर्षांचा मुलगा, १० आणि तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्याच कुटुंबातील १८ वर्षीय मुलगा आणि त्याची पाच वर्षीय बहिण बचावली आहे.

१५० कुटुंबाना शाळेत हलविले

येथील डोंगरावर वरपासून खालीपर्यंत घरे आहेत. परंतू आता दरड कोसळल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून येथील तब्बल १५० कुटुंबांना घोलाई नगर भागातील महापालिकेच्या शाळेत हलविण्यात आले आहे.

हेही वाचा -Mumbai Rains : कांदिवलीतील महापालिकेच्या पे अँड पार्कमधील 400 वाहनांना जलसमाधी

ABOUT THE AUTHOR

...view details