महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गाव विकासासाठी सर्व घटकांचा समावेश महत्वाचा - जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे

प्रत्येक गावाने वार्षिक गाव विकास आराखडा तयार करताना समाजातील विविध घटकांशी विचारविनिमिय करावा. त्यानंतरच तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत आराखडा तयार करून गावाची प्रगती करायला हवी, असे मत जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे यांनी व्यक्त केले.

By

Published : Jan 28, 2021, 11:43 PM IST

Sushma Lone
जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे

ठाणे - कोणत्याही गावाचा शाश्वत विकास करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. प्रत्येक गावाच्या गरजा तेथील समस्या निरनिराळ्या असतात. त्यामुळे गाव विकास प्रक्रियेत गावातील प्रत्येक घटकाला सामावून घेणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक गावाने वार्षिक गाव विकास आराखडा तयार करताना समाजातील विविध घटकांशी विचारविनिमिय करावा. त्यानंतरच तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत आराखडा तयार करून गावाची प्रगती करायला हवी, असे मत जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत ‘आमचा गाव आमचा विकास’ ही कार्यशाळा आज शहापूरच्या वन प्रशिक्षण सभागृहात संपन्न झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

जिल्ह्यातील ५० गावांमध्ये सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी गाव विकास आराखड्याचे महत्व विषद करून म. गांधी यांना अभिप्रेत असलेल्या ग्रामसमृद्धीची संकल्पना स्पष्ट केली. पुढे ते म्हणाले की, स्वच्छ भारत मिशन अभियानाच्या अंतर्गत जिल्ह्यातील ५० गावांमध्ये सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. गावातील परिसर स्वच्छ ठेवून आरोग्य समृद्धी नांदावी यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सागितले.

कार्यक्रमात ग्रामविकास आराखडा व निधीचे नियोजन

गावाच्या शाश्वत विकासासाठी भरीव योगदान देणारे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष भारत आप्पा पाटील यांनी स्वच्छतेतून ग्राम विकास तसेच पशुसंवर्धन कार्यक्रमातून ग्रामसमृद्धी आणि जिल्हा परिषद पदाधिकारी यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या यां विषयावर सखोल मार्गदर्शन केले. आरोग्य, स्वच्छता, लिंग गुणोत्तर, पशुसंवर्धन या विषयांवर त्यांनी केलेल्या कामाची गावाच्या विकासात फलश्रुती कशी झाली याबाबत त्यांनी अनुभव कथन केले. जिल्हा परिषद पदाधिकारी यांनी कसा प्रकारे विकास कामांचे नियोजन करायला हवे याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित जिल्हा परिषद सदस्यांशी प्रश्न-उत्तरांच्या माध्यमातून संवाद साधला. तर सांगली जिल्ह्यातील कुंडल गावचे ग्रामविकास अधिकारी श्रीधर कुलकर्णी यांनी सुनियोजित ग्रामविकास आराखडा व निधीचे नियोजन कसे असावे याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील, महिला व बाल कल्याण समिती सभापती रत्नप्रभा तारमळे, समाजकल्याण समिती सभापती नंदा उघडा, शहापूर पंचायत समिती सभापती रेश्मा मेमाणे, कृषि, पशूसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत) चंद्रकांत पवार, सहायक गट विकास अधिकारी ( ग्रामपंचायत ) हणमंतराव दोडके, तसेच जिल्हा परिषद सदस्य उल्हास बांगर, सुभाष घरत, मंजुषा जाधव, दिपाली पाटील, रेखा कंठे, तसेच इतर सदस्य उपस्थित होते. त्याचबरोबर तालुक्याचे गट विकास अधिकारी , इतर विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details