ठाणे : भाजपने महाविजय संकल्प २०२४ अभियान जाहीर केले असून लोकसभेच्या ४५, तर विधानसभेसाठी २०० जागांचे लक्ष्य निश्चित केले आहे. भाजप, शिंदे गट युतीत लढून विजय संपादन करतील, असे जाहीर करण्यात आले असले तरी, भाजपचे स्वबळावर सत्ता काबीज करण्याची तयारीत दिसत आहे. त्यातच मुख्यमंत्री पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटानेही भिवंडी लोकसभा मतदार संघाच्या मैदानात उतरण्याची तयारी केल्याचे चित्र दिसून आले.
शिंदे गटाकडून जोरदार तयारी :भिवंडी कल्याण लोकसभेसाठीची भक्कम बाजू मजबूत करण्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी केंद्रीय माहिती, प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर कल्याण लोकसभा क्षेत्रात भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले आहेत. असे, असतानाच शिंदे गटानेही भाजपच्या ताब्यात असलेल्या भिवंडी लोकसभा मतदार संघात निवडणूक लढविण्याची तयारी मुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवशी सुरु केली.
शिंदे गटानेही राजकीय खेळी :शिंदे गटाची ग्रामीण भागात पकड मजबूत आहे. भिवंडी लोकसभा मतदार संघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय सुरु करून भाजपाला शह देण्यासाठी शिंदे गट मैदानात उतरला आहे. यामुळे राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार असले तरी, समन्वयाने कल्याण लोकसभेची जागा भाजप बळकावणार अशीच चिन्हे दिसत असतानाच, शिंदे गटानेही राजकीय खेळी केल्याची चर्चा आता रंगली आहे. काही आठवड्यापूर्वीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बाळासाहेंबाच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर भिवंडी लोकसभा मतदार संघाच्या संपर्क प्रमुख पदी नियुक्ती केली. विशेष म्हणजे बाळ्या मामा हे भाजपचे भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार तथा पंचयात राज्य केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक असल्याचे जिल्ह्यात जाहीर आहे.