ठाणे - दारू पिल्यानंतर वाईन शॉप मालकाशी दारूच्या बिलावरून तळीरामांनी वाद घातला. तसेच जोरदार राडा करीत वाईन शॉपची तोडफोड करीत मालकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
ही घटना भिवंडी तालुक्यातील काल्हेर गावातील वाईन शॉपमध्ये घडली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामधील दोघांना अटक केली आहे. मयंक सज्जन अग्रवाल (वय 24) अंकुश सज्जन अग्रवाल ( वय 27 ) व जुली अंकुश अग्रवाल ( वय 25 सर्व रा. काल्हेर गाव) असे मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर देबु चक्रवर्ती वय 30 असे मारहाण झालेल्या वाईन शॉप मालकाचे नाव आहे.
काल्हेर गावात देबू चक्रवर्ती यांचा भंडारी नावाचा वाईन शॉप आहे. या वाईन शॉपमध्ये आरोपी अंकुश हा सायंकाळच्या सुमारास दारू पिण्यासाठी आला होता. दारू पिल्यानंतर त्याने दारूच्या बिलावरून वाईन शॉपचा मालक देबू यांच्याशी वाद घातला. या वादातून अंकुश आणि दारूच्या नशेत वाईन शॉपची तोडफोड करत शॉप मालक चक्रवर्ती याला बेदम मारहाण केली. सदरचा वाईन शॉप आरोपी अंकुशच्या घराच्या शेजारीच असल्याने त्याचा भाऊ मयंक व पत्नी जुली त्या ठिकाणी येऊन वाईन शॉप मालक व कामगारांना शिवीगाळ करून पुन्हा मारहाण केली.
याप्रकरणी शॉप मालक चक्रवर्ती यांनी नारपोली पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्या तसेच वाईन शॉपची तोडफोड केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी मयंक व अंकुश या दोघांना अटक केली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जी. बी. गणेशकर करीत आहेत.