ठाणे -लघुशंकेसाठी रेल्वेतून उतरलेल्या बाप-लेकीचा रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना कल्याणच्या पत्री पुलानजीक घडली. अर्शद खान (४०) आणि आयशा (८) असे रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेल्या बाप लेकीचे नाव आहे.
लघुशंकेसाठी उतरलेल्या बाप-लेकीचा रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्यू
कल्याणच्या पत्री पुलाजवळ रेल्वे धडकेत चिमुकल्या मुलीसह बापाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मुलीला लघुशंका लागली म्हणून तिच्या वडिलांसह ती लोकलमधून उतरली होती. तेवढ्यात रुळ ओलांडत असताना हा अपघात घडला.
कल्याणच्या गोविंदवाडी परिसरात मृत अर्शद कुटुंबासह राहत होते. त्यांची मुलगी आयशा ही कल्याणच्या बैलबाजार परिसरात असलेल्या के. सी गांधी स्कूलमध्ये दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत होती. या स्कुलमधील तिच्या वर्ग शिक्षकांनी तिला रिझर्व्ह बँकेचा प्रोजेक्ट तयार करण्याचे सांगितले. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी मुबंई फिरण्यासोबतच मुलीचा बँक प्रोजेक्ट होईल, असा विचार करून खान कुटूंब मुंबईला काल दुपारी गेले होते. तिथे रिझर्व्ह बँकेजवळ जाऊन आयशाने फोटोही काढले. त्यांनतर सायंकाळच्या सुमाराला मुंबईवरून कल्याणला येण्यासाठी खान कुटूंब लोकलने प्रवास करत होते. याच दरम्यान ठाकुर्ली रेल्वे स्थानकात मुलीला लघुशंकेसाठी जायचे होते. मात्र, लोकल पुढील प्रवासाला निघाल्याने ती जाऊ शकली नाही. त्यातच कल्याण रेल्वे स्थानकाच्या अलीकडे असलेल्या पत्रीपुलानजीक लोकल थांबली. त्यामुळे मुलगी व वडील लोकलमधून उतरून लघुशंकेसाठी गेले. तेवढ्यात पुन्हा लोकल कल्याणच्या दिशेने रवाना झाली. त्यामुळे अर्शद यांनी पत्नीला मोबाईलवर संर्पक करून लोकलमधून कल्याण रेल्वे स्थानकात उतरण्याचे सांगितले.
अर्शद आणि त्यांची मुलगी आयशा हे दोघेही काल (शनिवार) रात्री साडेतास ते आठच्या दरम्यान रूळ ओलांडून घराकडे जात होते. त्याच सुमाराला एका रेल्वेने जोरदार धडक दिल्याने बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कल्याण लोहमार्ग पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन बाप - लेकीचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला होता. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.