ठाणे- भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या ठाणेकरांसाठी आव्हान ठरले आहे. साईनाथनगर परिसरात घराच्या प्रांगणात खेळत असलेल्या नऊ वर्षीय मुलीला भटक्या श्वानाने चावा घेतल्याची घटना समोर आली आहे. श्वानाच्या हल्ल्यात मुलीच्या डोक्याला नऊ टाके पडले असून तिचा डोळा थोडक्यात बचावला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मुस्कान अन्वर शेख (९) असे जखमी मुलीचे नाव आहे.
ठाण्यात नऊ वर्षीय मुलीवर श्वानाचा हल्ला, थोडक्यात बचावली
रविवारी दुपारी मुस्कान घराजवळील परिसरात मित्रांसोबत खेळत होती. त्यावेळेस एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला.
मुस्कान वर्तकनगर येथील साईनाथनगर परिसरात आपल्या कुटूंबासह राहते. ती माजीवाडा येथील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. रविवारी दुपारी ती घराजवळील परिसरात मित्रांसोबत खेळत होती. त्यावेळेस एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे ती खाली पडली आणि त्यानंतर कुत्र्याने तिच्या डोक्याजवळ चावा घेतला. यावेळी तिच्या मित्रांनी पळ काढल्यामुळे ते हल्ल्यातून बचावले.
मुस्कानला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. मात्र, तिच्या डोळ्याजवळ जखम असल्यामुळे तिला मुंबईच्या जेजे रुग्णालयात उपचासाठी नेण्यात आले. डॉक्टरांच्या तपासणीत तिच्या डोळ्याला जखम झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. डोळ्याजवळील जखमेमुळे तिला अजूनही डोळा उघडता आलेला नाही. तसेच तिच्या डोक्याला नऊ टाके पडले आहेत. उपचारानंतर डॉक्टरांनी तिला घरी सोडले आहे.