ठाणे - भिवंडीचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांचा केंद्र शासनाच्या आंतरिक सुरक्षा पदकाने सन्मान करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ठाणे पोलीस आयुक्त विवेक फनसाळकर यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात पदक देऊन त्यांचा सन्मान केला.
राजकुमार शिंदे यांनी सन 2012 ते 2015 या काळात गडचिरोली येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यांच्या या कामगिरीची दखल थेट केंद्र शासनाने घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे. सध्या सर्वत्र कोरोना संकट असल्याने पोलीस आयुक्तांच्या हस्ते आज त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे हे 2005 साली पोलीस खात्यात रुजू झाले. सुरुवातीला नाशिक येथे पोलीस उपाधीक्षक म्हणून त्यांनी आपल्या पोलीस सेवेतील कार्याला सुरुवात केली. त्यानंतर ठाणे ग्रामीण, नांदेड, पुणे, गडचिरोली, मुंबई अशा विविध ठिकाणी त्यांनी सेवा बजावली आहे. सध्या ते ठाणे शहरांतर्गत असलेल्या भिवंडी परिमंडळ दोन मध्ये पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत.
संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भिवंडी शहरातदेखील आतापर्यंत त्यांनी उत्तम कामगिरी केली असल्याने शहरात शांतता प्रस्थापित होत आहे. सर्व धर्मातील नागरिकांशी त्यांचे मैत्रीपूर्ण सलोख्याचे संबंध असल्याने सध्या शहरात त्यांची चांगली पकड आहे.
गडचिरोली येथे सेवेत असताना केलेल्या विविध नक्षलवादी कारवायांमध्ये 36 नक्षलवादी ठार, तर 50 हून अधिक नक्षलवादी शरण आले होते. याच कार्याची दखल घेत केंद्र शासनाच्या आंतरिक सुरक्षा पदकाने राजकुमार शिंदे यांचा सन्मान करण्यात आला आहे.