ठाणे:गेल्याच महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यातील 10 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली होती. यानंतर तो मुंबई पोलिसांच्या कोठडीत होता. आता मात्र खंडणी प्रकरणात अनिल जयसिंघानी हा नवी मुंबईतील तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
कोट्यवधींची मालमत्ता उघडकीस: 'ईडी'कडून जयसिंघानीला ताब्यात घेण्यात आले होते. अनिल जयसिंघानी विरुद्ध 'मनी लाँड्रिंग' प्रकरणाची चौकशी करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जयसिंघानीशी संबंधित १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध मालमत्ता शोधल्या आहेत. त्यामध्ये बहुतांश मालमत्ता हॉटेल, फ्लॅट, दुकाने, जमीन पार्सल आणि इतर स्थावर मालमत्तांच्या स्वरूपात आहेत. जयसिंघानी आणि त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि जवळचे सहकारी यांची अनेक बँक खातीही 'ईडी'ने उघडकीस आणली आहेत. यामध्ये कोट्यवधींचा बेहिशेबी पैसा जमा करण्यात आला असल्याचे समोर आले आहे.
टॉप बुकींच्या यादीत जयसिंघानी: अनिल जयसिंघानी गेल्या सात ते आठ वर्षांपासून फरार होता. त्याच्यावर 16 गुन्हे दाखल आहेत. सट्टेबाजीच्या प्रकरणात तीनदा अटक करण्यात आली होती. जयसिंघानी हा दुबई, कराची आणि दिल्लीतील सट्टेबाजी सिंडिकेटशी संबंधित असल्याचेही समजते. तो देशातील 'टॉप बुकी' मानला जातो. गेल्याच महिन्यात 'ईडी'कडून झालेल्या तपासादरम्यान जयसिंघानीची बेकायदेशीर सट्टेबाजीतून खरेदी केलेली मालमत्ता 100 कोटीहून अधिक असल्याचे सांगण्यात आले. तर 'ईडी' अधिकारी मुंबई, ठाणे आणि दुबईतील काही परदेशी खेळाडूंसह काही बड्या बुकींमधील संबंधांची चौकशी करत आहेत.