ठाणे - भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा व नगरसेविका रेखा चौधरी यांनी कल्याणच्या पत्रीपुलाच्या कामाचे श्रेय केंद्र सरकारला देत, आभार मानून शिवसेना नेत्यांवर निशाणा साधला आहे. तसेच, जिल्ह्यातील माणकोली, दुर्गाडी, कोपर, पलावा या प्रमुख पुलांची कामे कधी पूर्ण करणार, असा सवाल राज्य सरकारला उपस्थित केला आहे.
ब्रिटिश कालीन पत्रीपुलाच्या उरल्या नाममात्र आठवणी
पत्रीपुलाच्या १९१४ साली बांधण्यात आलेल्यानाममात्र आठवणी उरल्या आहेत. विशेष म्हणजे, कल्याण-शिळफाटा रस्त्यातील रेल्वे मार्गावर असलेला हा बहुचर्चित पत्रीपूल १०४ वर्ष जुना व धोकादायक झाला होता. त्यामुळे, रेल्वे प्रशासनाने १८ नोव्हेंबर २०१८ ला मेगाब्लॉक घेऊन हा पूल पाडून त्याचठिकाणी नवीन पूल उभारण्याचे काम हाती घेतले होते. या पूल उभारणीच्या कामाला दोन वर्षे झाली, तरी वाहतुकीसाठी हा पूल सुरू करण्यात आला नाही. पूल सुरू करण्याबाबत संबंधित विभागाकडून फक्त तारखाच देण्यात आल्या. यामुळे पुलाचे बांधकाम आजतागायत पूर्ण न झाल्याने वाहतूक कोंडीत अडकून पडलेल्या कल्याण-डोंबिवलीकरांच्या अपेक्षाभंग झाल्या आहेत.