नवी मुंबई- देशात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढतच आहे. आपल्याला कोरोना झाला आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी बरेचसे नागरिक खासगी लॅबचा पर्याय निवडत आहेत. कोरोना चाचणी करणाऱ्या खासगी प्रयोगशाळेने चुकीचे अहवाल दिल्याचा ठपका ठेवत महानगरपालिका प्रशासनाने या प्रयोगशाळेवर कोरोना चाचणी करण्यावर बंदी घातली आहे. मात्र, पनवेल परिसरात तपासणी मुख्यालय सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने मनसेचे ठाणे पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पनवेल येथील थायरोकेयरच्या मुख्यालयावर धडक देऊन आंदोलन करण्यात आले.
सद्यस्थितीत कोरोनाचा सर्वत्र प्रसार वाढत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे कोरोनाची चाचणी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. पण, आता काही खासगी प्रयोगशाळाने यात देखील हेराफेरी करण्यास सुरुवात केली असल्याचे आरोप नागरिक करत आहेत. त्यात थायरोकेयर प्रयोगशाळेने तर नागरिकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. या प्रयोगशाळेमधून खोटे तपासणी अहवाल मिळत असल्याच्या अनेक तक्रारी येण्यास सुरुवात झाल्यानंतर शासन देखील खडबडून जागे झाले. त्या अनुषंगाने पनवेल, नवी मुंबई, मुंबईतील अनेक प्रयोगशाळा बंद करण्यात आल्या मात्र पनवेल येथील मुख्य तपासणी (टेस्टिंग) केंद्र मात्र सुरूच होते.