ठाणे- डोंबिवलीच्या पुलावर खाद्य पदार्थ तयार करणारे व ग्राहक यांच्यामध्ये गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बाचाबाची झाली व त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी सशस्त्र टोळक्याने केलेल्या हल्ल्यात तिघांची डोकी फुटली, तर त्यातील तिघांचीही प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना ठाण्याच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खळबळजनक बाब म्हणजे यातील आरोपी टोळके सुसाट गँगचे असल्याचे समोर आले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडून फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू असल्याचा डंका पिटला जात आहे. तरीही आजही फेरीवाले उघडपणे व्यवसाय करत आहेत. काही महिन्यांपूर्वी इंदिरा गांधी चौकात पदपथावर एका फेरीवाल्याने दुसऱ्या महिला फेरीवालीशी जागेवरून वाद घातल्याने दोन्ही गटातील फेरीवाल्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. या हाणामारीचे चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल होऊन चांगलेच गाजले होते. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर राजकीय पक्षांच्या आक्रमक आंदोलनानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली परिसरातील फेरीवाल्यांना रेल्वे स्टेशन परिसरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 150 मीटर परिसरात व्यवसाय लावण्याची बंदी घालण्यात आली. मात्र, आजही या परिसरात फेरीवाल्यांचा कब्जा कायम असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा - ठाण्यात 'लालपरी'मध्ये प्रवाशांच्या जीवाशी खेळ; व्हिडिओ व्हायरल