महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आचारसंहिता भंगप्रकरणी भिवंडीत भाजप पदाधिकाऱ्याला अटक, उमेदवारालाही बजावली नोटीस

भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी उत्तर भारतीय मतदारांना २९ एप्रिलला मतदान करुनच आपल्या गावी जावे, असे आवाहन केले होते. एवढेच नाही तर मतदारांना गावी जाण्यासाठी मी तिकिटे काढून देईन असे वक्तव्यही केले होते.

पंकज गायकवाड

By

Published : Apr 28, 2019, 4:27 AM IST

Updated : Apr 28, 2019, 6:25 AM IST

ठाणे -भिवंडीत परवानगी न घेता सभेचे आयोजन केल्याप्रकरणी भाजप पदाधिकारी सचिन जोगी यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याच सभेत मतदारांना प्रलोभने दाखवून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजप उमेदवार कपिल पाटील यांनाही ४८ तासात खुलासा देण्याची नोटीस निवडणूक आयोगाने बजावली आहे. या प्रकारामुळे भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे.

भिवंडी शहरातील ताडाळी येथील एका मोकळ्या मैदानावर २९ मार्च रोजी भाजपचे पदाधिकारी सचिन जोगी यांनी सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांनी मोबाईलच्या माध्यमातून उत्तर भारतीय मतदारांना २९ एप्रिलला मतदान करुनच आपल्या गावी जावे असे आवाहन केले होते. एवढेच नाही तर मतदारांना गावी जाण्यासाठी मी तिकिटे काढून देईन असे वक्तव्यही केले होते. सदरचा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. काँग्रेस पक्षाचे जिल्हा पदाधिकारी पंकज गायकवाड यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाटील यांच्याविरुद्ध मतदारांना प्रलोभने दाखवून आचारसंहितेचा भंग करत असल्याची तक्रार दाखल केली होती.

काँग्रेसचे पदाधिकारी पंकज गायकवाड

याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांजवळ या प्रकरणाची चौकशी केली असता असा कोणताच प्रकार घडला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, त्यानंतर एका वृत्तवाहिनीने याबाबची बातमी प्रसारित केल्यानंतर गायकवाड यांनी ठाणे पोलीस अधीक्षकांकडे याबाबत तक्रार दाखल केली आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनतर २९ मार्चला जी सभा घेण्यात आली त्या सभेसाठी कोणतीच परवानगी घेण्यात आली नसल्याचे पोलीस तपासात उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी सभा आयोजक जोगी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. मात्र, न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, भाजप उमेदवार कपिल पाटील यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी २५ एप्रिल रोजी नोटीस पाठवून आपले म्हणणे ४८ तासात मांडण्याचे आदेश दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मुदतीत भाजप उमेदवार पाटील यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. पाटील यांनी ज्या पद्धतीने प्रलोभन दाखवत आचारसंहितेचा भंग केला त्यावरुन त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी आपण करणार आहोत. तसेच याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयापर्यंत आपण लढा देण्यास तयार आहोत, अशी प्रतिक्रिया तक्रारदार पंकज गायकवाड यांनी ‘ईटीव्ही भारत’शी बोलताना दिली.

Last Updated : Apr 28, 2019, 6:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details