महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CSMT पूल दुर्घटना: अपूर्वाच्या जाण्याने प्रभू कुटुंबीयांचा संसार पडला उघड्यावर

अपूर्वांच्या मृत्यूने डोबिंवलीच्या प्रभु कुंटुबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर... सीएसएमटी पूल दूर्घटनेत जीटी रुग्णालयातील नर्स अपूर्वा प्रभूंवर काळाचा घाला.... आज दुपारी शोकाकूल वातावरणात करण्यात आले अंत्यसंस्कार

By

Published : Mar 15, 2019, 2:45 PM IST

अपूर्वा प्रभू

ठाणे - मुंबईच्या सीएसएमटी स्थानकाबाहेर झालेल्या पूल दुर्घटनेत डोंबिवलीच्या तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. या तिघीही मुंबईच्या जीटी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत होत्या. त्यापैकी अपूर्वा या प्रभू कुटुंबीयांचा एकमेव आधार होत्या. त्यांच्या जाण्याने पती, दोन मुलं आणि सासू असा त्यांचा संसार आता उघड्यावर पडला आहे.

अपूर्वा प्रभू

डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी परिसरातील बेडेकर गल्लीमधील उदयराज सोसायटीमध्ये मृत अपूर्वा गेल्या १५ वर्षापासून राहत होत्या. मृतक अपूर्वा सोबतच रंजना तांबे आणि भक्ती शिंदे डोंबिवली पश्चिमेला राहत असल्याने या तिघी गुरुवारी संध्याकाळी रात्र पाळीला जाण्यासाठी घरून निघाल्या होत्या. त्यांच्यासोबतच भागवत हाही जीटी रुग्णालयात कामावर जाण्यासाठी निघाला होता. हे चौघेही लोकलने सीएसएमटी स्थानकात उतरून रुग्णालयात जाण्यासाठी स्थानकालगत असलेल्या पुलावर जात होते. त्याच सुमाराला पूल कोसळला आणि त्यात या तिघींचाही दुर्दैवी मृत्यू झाला. सुदैवाने भागवत बचावल्याने त्याच्यामुळेच या तिघींना तत्काळ जीटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिघींचा मृत्यू झाला. तर भागवत गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर जीटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मृत अपूर्वा यांचे पती अभय हे अंधेरी येथील एका खासगी जाहिरात कंपनीत कार्यरत आहे. तर मुलगा गणेश हा सातव्या वर्गात तर मुलगी चिन्मया ही पाचव्या वर्गात शिक्षण घेत आहे. घरात ७० वर्षाच्या सासू असून अपूर्वा या प्रभू कुटुंबाचा मुख्य आधार होता. त्यांच्या जाण्याने प्रभू कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतक अपूर्वा यांना गेल्याच २६ जानेवारी रोजी ‘बेस्ट नर्सेस’चा राज्य शासनाकडून पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते. त्या मनमिळावू स्वभावाच्या होत्या. त्यामुळे राहत असलेल्या सोसायटीच्या प्रत्येक सार्वजनिक कामात जबाबदारी सांभाळून मुंबईच्या जीटी रुग्णालयात कार्यरत होत्या; अशी माहिती त्यांच्या शेजाऱ्यांनी दिली. दरम्यान, आज दुपारी १२ वाजल्याच्या सुमाराला डोंबिवली पूर्वेकडील संगीतावाडी परिसरातील शिवमंदिर मोक्षधाम येथे शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details