ठाणे- घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यात ठाणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. आठवड्याभरापूर्वी शहापूर तालुक्यातील शेलवली गावातील एका बंगल्यात दरोडा टाकून बंगला मालकाची हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करताना आढळलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.
सीसीटीव्हीने केला घरफोडीचा पर्दाफाश; दरोडेखोरांची टोळी गजाआड या टोळीकडून ठाणे आणि पालघर जिल्ह्यात दरोडेखोरीचे एकूण 19 गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून रोकड, हत्यारे, कार, दुचाकी असा एकूण 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी दिली. आरोपींना न्यायालयाने 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
चमन चव्हाण, अनिल साळुंके, संतोष साळुंके, रोहीत पिंपळे, बाबुभाई चव्हाण आणि रोशन खरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळक्याने 19 जुलैला शेलवली गावातील बंगल्यात दरोडा घातला होता. यावेळी बंगल्याची राखण करण्यासाठी असलेले कुत्रे भुंकू नयेत यासाठी दरोडेखोरांनी गुंगीचे औषध मिसळलेले मांस कुत्र्यांना खाऊ घातले होते. नंतर बंगल्यात शिरकाव केला. मात्र, बंगल्याचे मालक सुरेश नुजाजे यांनी प्रतिकार केल्याने दरोडेखोरांनी त्यांचे हातपाय बांधून मारहाण करत गळा आवळून हत्या केली.
याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा समांतर तपास करणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असात यातील काही संशयीत भिवंडीतील अंबाडी परिसरातील पडीक इमारतीत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून सहा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांची सखोल चौकशी केली असता सहाही आरोपीनी गुन्ह्याची कबूली दिली.
दरम्यान, फुगे आणि अन्य वस्तूंची विक्री करत असतानाच दरोडेखोर बंगल्यांची दिवसा रेकी करून रात्री दरोडा टाकत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.