ठाणे- उल्हासनगरात राहणाऱ्या एका बंटी-बबलीच्या जोडीने नाशिकच्या व्यापाऱ्याला १४ लाखांचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नाशिकच्या व्यापाऱ्याने त्या दोघांविरोधात कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -मुलाच्या वाढदिवसावरून वाद; पत्नीने पतीच्या डोक्यात फ्राय पॅन मारून सुरीने केले वार
विशेष म्हणजे, बंटी-बबलीच्या जोडीने स्वस्तात डंपर, पोकलेन व ट्रॅक्टरचे आमिष दाखवून त्या व्यापाऱ्याला गंडवल्याचे उघड झाले आहे. प्रवीण उशीर, असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे, तर सुनील जेठयानी आणि ज्योती जेठयानी अशी गुन्हा दाखल झालेल्या बंटी-बबलीच्या जोडीची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बंटी-बबलीने19 नोव्हेंबरला बँकेच्या लिलावामधून खरेदी केलेले डंपर, पोकलेन, ट्रॅक्टर स्वस्त दरात देतो. तसेच फायनान्स देखील उपलब्ध करून देतो, असे आमिष व्यापाऱ्याला दाखवले होते. या आमिषाला बळी पडत प्रवीण यांनी या दोघांना तब्बल 14 लाख 30 हजार रुपये दिले. मात्र, महिनाभराचा कालावधी उलटला, तरीही मशिन न दिल्याने प्रवीण यांना संशय आला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी सुनील आणि ज्योती जेठयानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.