ठाणे - काळजाचा ठोका चुकवणारी घटना मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकात घडली. प्लाटफॉर्मवर आपल्या अंध आईसोबत चालत असताना एक चिमुकला अचानक रेल्वे रुळावर पडला. त्याच सुमारास या रुळावरून वेगाने उद्यान एक्सप्रेस येत होती. यावेळी रुळांवर काम करणाऱ्या एका पॉईंटमनने जिवाची बाजी लावत या चिमुकल्याला रुळावरून उचलले व त्यास प्लाटफॉर्मवर ठेवून त्याचा जीव वाचवला. मयूर शेळके असे चिमुकल्याचा जीव वाचवणाऱ्या पॉईंटमनचे नाव आहे.
हेही वाचा -राष्ट्रवादीच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन
तोल जाऊन तो रेल्वे रुळावर पडला
वांगणी रेल्वे स्थानकातील प्लाटफॉर्मवर एक अंध महिला शनिवारी संध्याकाळच्या सुमारास आपल्या मुलासह चालत होती. याचवेळी, तो मुलगा प्लाटफॉर्मच्या कडेला गेला आणि तोल जाऊन तो रेल्वे रुळावर पडला. दरम्यान मुंबईकडे जाणारी उद्यान एक्स्प्रेस ट्रेन अवघ्या काही सेकंदातच तिथे येणार होती. चिमुकला रेल्वे रुळावर पडल्याचे पॉईंटमन मयूर शेळके यांनी पाहिले. एक्स्प्रेस समोर दिसल्याने क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी मुलाच्या दिशेने धाव घेतली आणि त्याला प्लॅटफॉर्वर घेतले. अवघ्या काही सेकंदांनी मुलगा आणि पॉईंटमनचेही प्राण वाचले. त्यानंतर एक ते दीड सेकंदांच्या अंतराने याच रुळावरून एक्सप्रेस वेगात पुढे निघून गेली.