ठाणे - सहा वर्षीय बालिका राहत्या घरासमोर खेळत असताना एका १८ वर्षीय नराधमाने खाऊचे अमिष दाखवून, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी शहरातील ब्रम्हानंद नगर, कामतघर परिसरात घडली. या घटनेने परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
खाऊचे अमिष दाखवून ६ वर्षीय बालिकेवर अत्याचार; नराधमाला पोलीस कोठडी
सहा वर्षीय बालिका राहत्या घरासमोर खेळत असताना एका १८ वर्षीय नराधमाने खाऊचे अमिष दाखवून, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे
प्रतिक उर्फ माउली परमेश्वर कुंभार (वय १८ रा.ब्रम्हानंद नगर ) असे नराधमाचे नाव असून नारपोली पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सहा वर्षीय बालिका बुधवारी दुपारच्या सुमाराला घरासमोर खेळत असताना नराधमाने तिला खाऊचे अमिष दाखवून त्या बहाण्याने तिला त्याच्या ढोलकी बनवण्याच्या दुकानात बोलावले व तिच्यावर अमानूष अत्याचार केला. त्यानंतर बालिका घरात आली असता, ती वेदनेने व्याकूळ झाली. त्यामुळे पीडितेच्या आईने तिच्याकडे चौकशी केली असता, हा प्रकार उघडीस आला.
या घटनेप्रकरणी मुलीच्या आईने नारपोली पोलीस ठाण्यात धाव घेवून नराधम प्रतीक विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. या घटनेची दखल घेवून पोलिसांनी प्रतिक याचा शोध घेऊन अटक केली. आरोपीला भिंवडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.