महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-नाशिक महामार्गावर 1600 किलो गोमांसासह टेम्पो जप्त; चालकासह मांस विक्रेता फरार

मुंबई-नाशिक महामार्गावरील रांजणोली बायपास नाका येथे गोमांसाने भरलेला टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावर 1600 किलो गोमांसासह टेम्पो जप्त; चालकासह मांस विक्रेता फरार

By

Published : Jun 16, 2019, 8:19 PM IST

ठाणे- मुंबई-नाशिक महामार्गावरील रांजणोली बायपास नाका येथे गोमांसाने भरलेला टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे. या टेम्पोमध्ये तब्बल 1 हजार 600 किलो गोमांस आढळून आले. खळबळजनक बाब म्हणजे पोलिसांकडून टेम्पोची तपासणी सुरू असतानाच चालकासह मांस विक्रेता फरार झाले आहेत.

कोनगाव पोलिसांना ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यालयातून एका टेम्पोमधून गोवंशीय मांस मुंबईत विक्रीसाठी जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश काटकर यांनी तत्काळ पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे यांना बायपास नाक्यावर सापळा लावून कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस पथकाला महामार्गावरील प्रवीण लॉजसमोरुन एक संशयास्पद टेम्पो भरधाव वेगाने जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी सतर्क होऊन टेम्पोला अडवून तपासणी केली. त्यावेळी टेम्पोमध्ये गोमांस असल्याचे आढळून आले.

सदरच्या गोमांसाची पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अली यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून घेतल्यानंतर ते गोवंशीय मांस असल्याचा अभिप्राय प्राप्त झाला. त्यामुळे सदरच्या 1 हजार 600 किलो गोवंश मांस जप्त करून न्यायालयाच्या आदेशाने मांस खाडी किनारी जमिनीत पुरून त्याची विल्हेवाट लावली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details