सोलापूर- दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन (World Diabetes Day) साजरा केला जातो. जगभरात मधुमेह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. भारतीय नागरिकांच्या गेल्या काही वर्षांत बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेह आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतात दरवर्षी 10 लाखांहुन अधिक लोकांचा किंवा रुग्णांचा मृत्यू मधुमेहामुळे होत आहे. याबाबत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली असून 2030 साली जगभरात मधुमेह रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन त्याचा विस्फोट होणार असल्याची माहिती दिली आहे. भारतात प्रत्येक बारा व्यक्तीमागे एक व्यक्ती मधुमेहाचा रुग्ण आढळून येत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर भारत देश हा मधुमेहाची राजधानी होण्यास वेळ लागणार नाही. चीननंतर (china) भारताचा मधुमेहाच्या रुग्णांच्या बाबतीत दुसरा क्रमांक आहे.
मधुमेहामुळे हृदयरोग, किडनी, डोळ्याचा समस्या होतात -
एखाद्या व्यक्तीस मधुमेह आजार जडला तर त्याला हृदयरोग, किडनीचा आजार तसेच डोळ्यांच्या समस्या निर्माण होतात. मधुमेहावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. त्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. इंटरनॅशनल डायबेटीज फेडरेशनच्या 2017 च्या अहवालानुसार जगभरात 7 कोटींहून अधिक रुग्ण मधुमेहाचे आहेत. 2030 किंवा 2034 पर्यंत जगभरात 13 कोटींहून अधिक रुग्ण असण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रुग्णांनी आपली मधुमेहाची पातळी एक टक्क्यांनी कमी तर मधुमेह नियंत्रणात राहू शकतो. त्यामुळे पॅरॅलीससचा धोका (paralysis) 12 टक्के कमी होतो. हार्टअटॅकचा धोका (Heart attack) 14 टक्के कमी होऊ शकतो. किडनीचे आजार 33 टक्के तर मधुमेहामुळे अवयव कापण्याच्या प्रमाणात 43 टक्क्यांनी कमी येते. आरोग्य उत्तम राखण्यासाठी सर्वांनी मधुमेहाची चाचणी करून घेणे आवश्यक असल्याचे मत मधुमेह तज्ञ डॉ पी.वी. स्वामी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.