सोलापूर- वळसंग पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी बुधवारी दिवसभर कारवाई करत एकाच दिवसात दोन जुगार अड्ड्यावर छापा टाकून सुमारे 3 लाख 53 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे दोन्ही जुगार अड्डे कुंभारी येथील एका शेतात चालत होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू होती.
वळसंग पोलीस ठाणे मधील पोलिसांना एका गुप्त बातमीदारा मार्फत कुंभारी गावातील मल्लू जमादार यांच्या शेतात सात ते आठ इसम हे एकत्रित बसून मन्ना नावाचा जुगार खेळत आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शहानिशा केली असता काही इसम हे जुगार खेळताना दिसून आले. त्याच अनुषंगाने पोलिसांनी कुंभारी येथील मल्लू जमादार यांच्या शेतात छापा टाकला असता दोन आरोपी हे पळून गेले आणि तीन आरोपी हे मिळून आले आहेत. या कारवाईमध्ये मुरलीधर रामदास गलमय (वय 40, रा. 19 / 6 क विभाग विडी घरकुल कुंभारी), श्रीनिवास गुंडली (वय 40 रा. लक्ष्मीनारायण टॉकीज एमआयडीसी सोलापूर ) आणि रोहित चंद्रकांत मेघजी (वय 28 रा. घोंगडे वस्ती सोलापूर) यांच्याकडून आठ हजार 610 रुपये रोख रक्कम तीन मोबाईल, तीन हिरो होंडा कंपनीचे मोटरसायकल असे साहित्य मिळून आले. त्याची एकूण किंमत ही एक लाख 46 हजार 610 इतकी आहे.
सदर कामगिरी ही वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानगावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय हंचाटे, पोलीस कॉन्स्टेबल सूर्यकांत बिराजदार, फिरोज इनामदार, अशफाक मियावाले, लक्ष्मण काळजे, दिनेश पवार यांनी पार पाडली.
दुसरी कारवाई मौजे कुंभारी शिवारातील रिलायन्स कॅन्सर हॉस्पिटलच्या समोरील मैदानात काही इसम हे गोलाकार बसून मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची ही बातमी पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे वरील ठिकाणी पोलिस गेले असता आठ ते दहा जण हे जुगार खेळताना मिळून आल्याने त्यांवर देखील कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी जमीर शेख (वय 44 रा. रविवार पेठ, सोलापूर) अलीम जरतारघर (वय 40 रा. 652 साखर पेठ, सोलापूर), मोहम्मद बिल्लेवाले (वय 19 रा. 70 फूट रोड ,सोलापूर) आसिफ जकलेर (वय 31, रा. 290 शनिवार पेठ, सोलापूर ), महंमद बागवान (वय 40 रा. साखर पेठ, सोलापूर), मोहम्मद शेख (वय 23 रा रविवार पेठ ,सोलापूर), असलम मुल्ला (वय 43 रा. रविवार पेठ, सोलापूर), सैपन इरकल (वय 35 रा. तेलंगी पच्चा पेठ, सोलापूर ), परवेज पेरमपल्ली (वय 29 रा. पाथरूड चौक ,सोलापूर ), सादिक नाईकवाडी (वय 22 रा. साखर पेठ, सोलापूर) यांच्याकडून 12 हजार 620 रोख रक्कम, 10 मोबाईल, दोन ॲपे रिक्षा असे मिळून एकूण किंमत 2 लाख 7 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई वळसंग पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक हंचाटे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस कॉन्स्टेबल सय्यद , गायकवाड, पोलीस नाईक माने, गुंड आदींनी ही कारवाई केल्याची माहिती वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हंचाटे यांनी दिली.