सोलापूर - उजनी धरणाला पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा. तसेच धरणाच्या बॅकवॉटर परिसराचा विकास करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय पाटील भीमानगरकर यांनी केली आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय पाटील भीमानगरकर उजनी धरण हे महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी एक आहे. या धरणामुळे सोलापूर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढले. त्यामुळे पर्यायाने साखर कारखानदारीदेखील वाढली आहे. सोलापूर जिल्ह्याची वरददायिनी म्हणून उजनी धरणाची ओळख आहे. या धरणामुळे अनेकांच्या जीवनात कायापालट झाला आहे. ज्यांची शेती कोरडवाहू होती त्यांची शेती बागायती झाली. तसेच उसामुळे काही प्रमाणात आर्थिक सुबत्ता या परिसरात निर्माण झाली आहे.
परंतु असे असले तरी ज्यांच्याकडे शेती नाही, अशा कुटुंबांना मात्र अजूनही आर्थिक समस्या भेडसावत आहेत. उजनी धरणाच्या परिसरातील तरुणांच्या हाताला काम मिळावे, यासाठी उजनी धरणाचा परिसर हा पर्यटन स्थळ म्हणून विकसित करावा, अशी मागणी संजय पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
उजनी धरणाच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर संपादित केलेले क्षेत्र आहे. या संपादित असलेल्या क्षेत्रावर मोठा बगीचा विकसित केला तर पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणाला मोठी चालना मिळेल. तसेच तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल. त्यामुळे उजनी धरणाला पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन विकास करण्याची गरज असल्याचे संजय पाटील यांनी म्हटले आहे.
उजनी धरणाच्या बॅकवॉटर बोटिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली तर या धरणाकडे पर्यटक नक्कीच आकर्षित होतील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला आहे. उजनी धरण हे सोलापूर-पुणे या राष्ट्रीय महामार्गावर असून महामार्गापासून काही मीटर अंतरावर धरणाची साईट आहे. याठिकाणी वृंदावनसारखे गार्डन तयार केले तर पर्यटकांसाठी ते एक रम्य स्थळ होईल. उजनी धरणाचा पर्यटनस्थळाच्या दृष्टीने विकास आराखडा तयार केला असून तो लवकरच मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार असल्याचे संजय पाटील यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
आलमट्टी धरणप्रमाणे विकास करावा -
कर्नाटक सरकारने कर्नाटकातील आलमट्टी धरणाच्या खालील बाजूला पर्यटनस्थळ म्हणून मोठा विकास केला आहे. त्याप्रमाणेच उजनी धरणाचाही पर्यटनस्थळ म्हणून राज्य सरकारने विकास करावा. जेणेकरून परिसरामध्ये पर्यटनाला चालना मिळेल आणि बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल. तसेच पुणे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर हा स्पॉट असल्यामुळे त्याला मोठी प्रसिद्धी मिळेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.
राज्य सरकारने उजनी धरण हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी लवकरात लवकर पावले उचलावीत, यासाठी भीमानगर ग्रामपंचायतीच्यावतीने देखील पुढाकार घेतला आहे. तसेच यासंदर्भात उजनी धरणाच्या पर्यटन विकास आराखडा सादर करण्यात येणार आहे.