बार्शी - येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी उपचार घेत असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. तर केवळ ऑक्सिजनअभावी नाहीतर रुग्णांची स्थिती आणि वाढते वय यामुळे उपचारास ते प्रतिसाद देत नसल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे प्रशासकीय अधिकारी बन्सीलाल शुक्ला यांनी सांगितले.
दोन कोरोना रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू
बार्शी येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये सोमवारी सकाळी दोन कोरोना रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचे समोर आले होते. सोमवारी पहाटेपासून रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन मिळाला नसल्याने बार्शी तालुक्यातील चुंब येथील अश्रूबाई लक्ष्मण सांगळे, (65) तर सोलापूर येथील जनाबाई बंडगर (70) यांचा मृत्यू झाला आहे. पहाटेपासून ऑक्सिजन मिळाला नसल्याचे रुग्ण नातेवाईकांचे म्हणणे आहे. तर केवळ ऑक्सिजनची कमतरता नाही या दोन्हीही रुग्णांना इतर आजार होते. शिवाय दोघांचे वयही अधिक असल्याने त्यांनी उपचारास प्रतिसाद दिला नसल्याचे प्रशासकीय अधिकारी शुक्ला यांनी सांगितले आहे.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार
दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली होती. दरम्यान, ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्ये दोन रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची घटना बार्शीत घडली आहे.