सोलापूर-भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर हे आज रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते. पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ पडळकरांनी सोलापूर दौरा केला, यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केल्याचे त्यांनी म्हटले.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अपुरी मदत
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना राज्य सरकारने पुरेशी मदत केली नसल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. तसेच सरकारला कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात देखील अपयश आल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. असं सरकार महाराष्ट्राच्या नशिबी येणे हे जनतेचे दुर्दैव असल्याची टीका त्यांनी केली.
मराठा आरक्षणापेक्षा सरकारला अर्णब गोस्वामी महत्त्वाचा
यावेळी पडळकर यांनी मराठा आरक्षणावर बोलताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकारला मराठा आरक्षणापेक्षा अर्णब महत्त्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले. राज्य सरकारकडून अर्णब केसवर प्रचंड पैसा खर्च करण्यात आला, मात्र त्यांना मराठा आरक्षणासाठी वेळ नाही, त्यांनी मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला असल्याचा आरोप यावेळी पडळकर यांनी केला.
राज्य सरकारकडून मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा पडळकरांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात येऊन 'सिरम'ला भेट दिली, त्यावरून सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. लस ही पुणेकरांनी शोधली आहे, नाही तर ते म्हणायचे आम्ही शोधली. असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले होते. या वक्तव्याचा देखील पडळकर यांनी समाचार घेतला आहे. सुळे या खासदार असून देखील बालिश बुद्धी असल्यासारखे बोलतात असे त्यांनी म्हटले.